सांंगली : घरात, भावकीत किरकोळ कारणावरून वाद असतो, मात्र ज्या वेळी बाह्य शक्ती विरोधात उभ्या ठाकतात, अशावेळी घरातील मतभेद गाडून एकत्र येण्याची परंपरा आजही ग्रामीण भागात दिसून येते. अशीच स्थिती गटा-तटात विखुरलेल्या सांगली जिल्ह्यातील काँग्रेसची सध्या दिसत आहे. एरवी गटातटाच्या राजकारणामुळे जिल्ह्यात भाजपला आवातनं दिल, घरात पाहुणा म्हणून आलेला भाजप उपर्यांना घेउन जिल्ह्याचा मालक कधी झाला हे कळलेच नाही. आता मात्र उबाठा शिवसेनेने आक्रमक पणे सांगलीच्या जागेवर हक्क सांगताच माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ काँग्रेस उमेदवारीसाठी एकत्र आल्याचे चित्र दिसले. उमेदवारीच्या स्पर्धेत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना बाहुल्यावर चढवून वर्हाडी मंडळी तिकीटासाठी मुंबईत ठाण मांडून आहेत. आता महाविकास आघाडीतील कुरघोडीच्या राजकारणात कोल्हापूरसाठी सांगलीचा बळी नको म्हणून टोकाची भूमिका घेण्याची मानसिकता कदमांनी ठेवली आहे.
मुळात सांगलीच्या जागेसाठी महाविकास आघाडीत बेबनाव नव्हताच, पण गेल्या आठ दिवसात डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी लोकसभेच्या उमेदवारीचा शब्द घेउन शिवबंधन हाती बांधताच सेनेने आक्रमकपणे पैलवानांनाच सांगलीची उमेदवारी जाहीर करत प्रचार शुभारंभ पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर करून टाकला. यामुळे कधी नव्हे ते काँग्रेस यावेळी आक्रमकपना घेताना दिसत आहे. जर ठाकरे सेनेला उमेदवारी दिली गेली तर मैत्रीपूर्ण लढतीचा पर्यायही काँग्रेसकडून चर्चेला आणून ठाकरे शिवसेनेच्या आक्रमकपणाला वेसन घालण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा… भाजपला ‘ ठाकरें ‘ ची राजकीय गरज?
मात्र, महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप चर्चेच्या पातळीवर आहे राज्यातील ४८ जागा पैकी २० ठाकरे शिवसेनेला, १८ जागा काँग्रेसला आणि १० जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना असे सूत्र होते. मात्र, कोल्हापूरची शिवसेनेची जागा छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी सर्वसहमतीने मान्य केली असताना त्यांनी काँग्रेसच्याच चिन्हावर निवडणूक लढविणार असे सांगितल्याने सेनेची एक जागा कमी होत असल्याने पश्चिम महाराष्ट्रात मशाल चिन्ह असावे या भूमिकेतून सांगलीच्या जागेवर हक्क सांगितला. मात्र, सांगली लोकसभ मतदार संघात सेनेची ताकदच तोळामासा असल्याने या दाव्याला बळकटी म्हणावी तशी दिसत नसताना केवळ पैलवानाच्या ताकदीवर जागेचा हट्ट कायम ठेवला आहे.
हेही वाचा… प्रवाहाच्या विरोधात जाणारा लोकसभा मतदारसंघ ही रायगडची ओळख !
महाविकास आघाडीमध्ये भिवंडी, जालना, रामटेक आणि सांगली या जागाबाबत रस्सीखेच सुरू असताना केवळ सांगलीच्या जागेबाबत एवढी मोठी चर्चा का होत आहे याचे काँग्रेसला आश्चर्य वाटते. एकेकाळी राज्यात कोणाला उमेदवारी द्यायची हे सांगलीकडून सांगितले जात होते. काँग्रेसची ही पत आता कमी झाली असून उमेदवारीसाठी काँग्रेसला झगडावे लागत आहे. काँग्रेसची अशी अवस्था होण्यामागे मित्र पक्षातील काही नेतेही कारणीभूत असल्याची चर्चा गतीने होत असून यामागे जिल्हा नेतृत्वाची स्पर्धाही कारणीभूत आहे. भाजपच्या मोदी कालखंडाचा उदय झाल्यानंतर काँग्रेसची ताकद कमी होउ लागल्याचा बनाव करून अन्य पक्षांना अवकाश निर्माण करून देण्याचे हे प्रयत्न कोण तरी करत आहे. यातून दादा घराण्यातील वारसदारांना राजकीय अवकाश मिळू नये हा जसा प्रयत्न आहे तसाच स्थानिक पातळीवर सत्तेच्या मांडवातून बाहेर काढण्याचा डाव तर नाही नाअशी शंकास्पद स्थिती निर्माण झाली आहे.