लोकसभा निवडणुकीला अगदी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. परंतु, जागावाटपावरील नाराजीचा सूर अजूनही ऐकू येतोय. जवळ जवळ सर्वच पक्षांत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. बिहारमध्ये अनेक दिवस जागावाटपाचा तिढा सुटत नव्हता. इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि आरजेडी यांच्यातील जागावाटपाची चर्चा ही प्रामुख्याने पूर्णिया जागेवर अडकली होती. अखेर बिहारमध्ये इंडिया आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटला आणि पूर्णिया ही जागा आरजेडीने माजी मंत्री आणि रुपौली आमदार बिमा भारती यांना दिली. माजी खासदार राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव हे या जागेवरून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. त्यांनी काही दिवसांपूर्वीच आपला जन अधिकार पक्ष (जेएनपी) काँग्रेसमध्ये विलीन केला होता.
जागावाटपाच्या निर्णयावरून नाराज पप्पू यादव यांनी पूर्णिया लोकसभा जागेवरून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांना सीमांचल प्रदेशातील बाहुबली राजकारणी म्हणून ओळखले जाते. ते आतापर्यंत पाचवेळा खासदार राहिले आहेत. राजकीयदृष्ट्या मला संपवण्याचा कट असल्याचा आरोप त्यांनी आरजेडीवर केला. व्यासपीठावर बोलत असताना त्यांना भावना अनावर झाल्या आणि ते ढसाढसा रडू लागले. पुन्हा खासदार होण्याचे सर्व गुण त्यांच्यात आहेत, असा दावा त्यांनी केला. काँग्रेसने त्यांना अधिकृतपणे पाठिंबा देण्यास नकार दिला आहे.
नुकताच त्यांनी आपला जन अधिकार काँग्रेसमध्ये विलीन केला होता. त्यांना पूर्णियामधून पक्षाच्या तिकिटाची अपेक्षा होती, पण आरजेडीने काँग्रेसला ही जागा नाकारली आणि जेडी(यू)चे विद्यमान खासदार संतोष कुमार कुशवाह यांच्या विरोधात जेडी(यू) बंडखोर आणि माजी राज्यमंत्री विमा भारती यांना उमेदवारी जाहीर केली.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कुशवाह यांनी काँग्रेसचे उदय सिंह यांचा २.६ लाख मतांनी पराभव केला होता. आता पप्पू यादव निवडणूक रिंगणात उतरले आहेत, त्यामुळे पूर्णिया येथे तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. पप्पू यादव अपक्ष म्हणून लढणार असल्याने विमा भारती यांना मिळणार्या मतांमध्ये कपात होण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट फायदा एनडीएचे उमेदवार कुशवाह यांना होईल.
हेही वाचा : वयाच्या ८३ व्या वर्षी शरद पवार ‘अशी’ घेतात आपल्या आरोग्याची काळजी
“राजकीयदृष्ट्या मला संपवण्याचा कट”
पप्पू यादव यांनी १९९१, १९९६ आणि १९९९ पूर्णियामधून तीनदा विजय मिळवला होता. त्यानंतर मधेपूरमधून ते दोनदा निवडून आले. गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पप्पू यादव यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले, “मला पूर्णियाचे तिकीट नाकारून, आरजेडी राजकीयदृष्ट्या मला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. मी सुरुवातीपासूनच पूर्णियामधून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला होता. पक्ष विलीन करण्यापूर्वी मी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना ते कळवले होते. मी आरजेडीप्रमुख लालू प्रसाद यांचीही भेट घेतली होती, त्यांनी मला मधेपुरा किंवा सुपौलसाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला होता. पण, तिथल्या लोकांशी असलेल्या माझ्या नात्यामुळे मी पूर्णियाला पसंती दिल्याचे त्यांना सांगितले होते.” “जर राजकारणातील लालू प्रसाद यांची मुले आणि मुली राजकारणी होण्यास पात्र ठरत असतील, तर माझ्यात काय कमतरता आहे,” असा प्रश्न त्यांनी विचारला.
पप्पू यादव यांनी समाजवादी नेते आणि माजी खासदार शरद यादव यांचे राजकीय व्यवस्थापक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. बिहारच्या सीमांचल आणि कोसी प्रदेशाशी (पूर्णेया, सहरसा, मधेपुरा आणि सुपौल यांचा समावेश असलेल्या) दीर्घकालीन संबंध राहिला आहे. त्यांनी असा दावा केला की, “पूर्णियाच्या लढाईसाठी मला माझ्या पक्षाचा पाठिंबा आहे.” बिहार काँग्रेसचे प्रमुख अखिलेश प्रसाद सिंह यांनी मात्र, “पक्ष त्यांच्या (पप्पू) उमेदवारीला पाठिंबा देणार नाही”, असे म्हटले आहे.
पप्पू यादव यांच्या उमेदवारीवर काँग्रेसची प्रतिक्रिया
प्रदेश काँग्रेसने अधिकृतपणे सांगितले की, ते त्यांच्या वरिष्ठ मित्रपक्षाला दिलेल्या पूर्णिया जागेवरील आरजेडी उमेदवारालाच पाठिंबा देतील. जागावाटप करारात राज्यातील ४० जागांपैकी आरजेडी २६ जागा लढवत आहे आणि काँग्रेस ९ जागा लढवत आहे. उर्वरित पाच जागा डाव्या पक्षांना देण्यात आल्या आहेत.
अखिलेश प्रसाद सिंह हे पप्पू यादव यांच्या पक्षप्रवेशाच्या आणि पूर्णियामधून निवडणूक लढवण्याच्या विरोधात होते, असा दावा प्रदेश काँग्रेसच्या एका गटाने केला आहे. “पप्पू यादव यांची पत्नी रंजीत रंजन या आधीच काँग्रेसच्या राज्यसभा खासदार असल्याने अखिलेश विरोधात होते. पप्पू यादव यांच्यामुळे काँग्रेसमध्ये असणारा त्यांचा प्रभाव कमी होईल, अशी भीती त्यांना होती”, असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. आरजेडीतील एका नेत्याने सांगितले की, “पप्पू यादव यांची पूर्णियामधून उमेदवारी आघाडीसाठी अडचण ठरू शकते. परिसरातील त्यांची लोकप्रियता पाहता, ही लढत चुरशीची ठरेल.” पूर्णिया येथे २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.