संतोष प्रधान
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेल्या बाळासाहेब थोरात यांची नाराजी दूर करण्याकरिता राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांनी मुंबईत धाव घेतल्याने दिल्लीतील नेतृत्वाने थोरात यांना एक प्रकारे बळ दिले आहे. थोरात यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत झालेल्या गोंधळावरून नाराज झालेल्या बाळासाहेब थोरात यांनी पक्षाध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांना पाठविलेल्या पत्रात विधिमंडळ पक्षनेतेपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली. सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीवरून झालेल्या घोळानंतर थोरात यांचे जिल्ह्यातील पक्ष संघटनेत पंख कापण्याचे प्रयत्न झाले त्यामुळे ते व्यथित झाले होते. विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून नगर जिल्हा काँग्रेसवर थोरात यांचे एकहाती वर्चस्व होते. तांबे यांच्या उमेदवारीवरून जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तसेच कार्यकारिणी बरखास्त केल्याने थोरात अधिक संतप्त झाले. यातूनच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
हेही वाचा… समाज माध्यमातील घटता वापर भाजपासाठी चिंताजनक
बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याचे दिल्लीत पडसाद उमटले. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या पातळीवर दखल घेतली गेली. राज्याचे प्रभारी पाटील यांना दिल्लीत पाचारण करून थोरात- पटोले वाद मिटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. यानुसारच पाटील हे रविवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाले. त्यांनी थेट थोरात यांचे निवासस्थान गाठले. वादावर पडदा पाडण्याची विनंती केली.
हेही वाचा… भाजपचा ‘महाविजय संकल्प’ हा शिंदे यांच्या शिवसेनेला सूचक इशारा?
नगर जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाबाबत थोरात यांच्या कलाने घेतले जाईल, असे आश्वासन पक्षाच्या वतीने देण्यात आले. तसेच दिल्लीत जाऊन खरगे यांच्याशी चर्चा करण्यासही सांगण्यात आले. एखाद्या नेत्याने राजीनामा दिल्यावर काँग्रेसमध्ये नेत्याची फार काही मनधरणी केली जात नाही. पण सध्याच्या स्थितीत थोरात यांच्यासारखा निष्ठावान नेत्याची नाराजी पक्षाला परवडणारी नाही. यातूनच थोरात यांना बळ देण्यात आले आहे.