काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी लोकसभा खासदार शशी थरूर इच्छुक आहेत. त्यांनी सोमवारी सोनिया गांधींची भेट घेऊन निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. निवडणूक झाल्यास त्यात तटस्थ राहण्याचे आश्वासन सोनिया गांधींनी थरूर यांना दिले आहे. राहुल गांधी यांनी त्यांचा विचार बदलून अध्यक्षपदाची निवडणूक लढवतील अशी अशा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना आहे. मात्र राहुल गांधी निवडणूक न लढवण्याचा त्यांच्या मुद्द्यावर ठाम राहिल्यास गेहलोत हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरू शकतील, असे सूत्रांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुक्रवारी परदेशातून आल्यानंतर थरूर आणि सोनिया गांधी यांची भेट झाली. अनेक राज्यांनीराहुल गांधी यांनी अध्यक्षपदावर विराजमान व्हावे यासाठी ठराव मंजूर केला आहे. मात्र, सोनिया गांधींनी थरूर यांना सांगितले की, येत्या निवडणुकीत त्या आणि त्यांचे कुटुंब तटस्थ राहतील.


थरूर हे काँग्रेसच्या जी-23 नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी पक्ष चालवण्याच्या पद्धतीत व्यापक बदल करण्याची भूमिका मांडलेली आहे. त्यांनी सोनिया गांधींसोबत झालेल्या ४० मिनिटांच्या बैठकीत नेमके काय झाले याची माहिती देण्यास नकार दिला. त्यांच्याशी बोललेल्या काही नेत्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, सोनिया गांधी यांनी तटस्थ राहणार असल्याचे आश्वासन दिले. त्या कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नाही किंवा त्यांच्यातर्फे कुणीही उमेदवार निवडणुकीत उभा राहणार नाही.

काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, थरूर यांना मुक्त आणि निष्पक्ष निवडणुक होण्याचे आश्वासन मिळाले आहे. अध्यक्षपदासाठी दमदार लढत झाल्यास पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास थरूर यांना आहे.

काँग्रेसमधील सूत्रांनी यापूर्वीच सोनिया गांधी यांनी गेहलोत यांना पक्षाचे नेतृत्व करण्यास सांगितले असल्याचे संकेत दिले होते. त्या पार्श्‍वभूमीवर सोनियांनी तटस्थ राहण्याचा थरूर यांना दिलेला संकेत महत्त्वाचा आहे. काँग्रेसच्या जी-23 चे नेते या निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित करत असल्याने, निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष होतील, असा संदेश देण्याचा प्रयत्न म्हणून याकडे पाहिले जात आहे.

राहुल गांधींच्या ठरावांनी चिंता वाढली

दुसरीकडे काँग्रेसचे म्हणणे आहे की, राहुल गांधी यांना पक्षप्रमुख म्हणून पाठिंबा देणाऱ्या ठरावांचा पक्षाच्या निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, ज्याप्रमाणे जी-23 मधील नेते चिंता व्यक्त करत आहेत, त्याप्रमाणे या ठरावांमुळे राहुल गांधींचा विचार बदलू शकतो.

याबाबक काँग्रेसचे नेते जयराम रमेश म्हणाले की, “ज्याला निवडणूक लढवायची आहे त्याचे स्वागत आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची हीच भूमिका कायम आहे. ही एक खुली, लोकशाही आणि पारदर्शक प्रक्रिया आहे. उमेदवारीसाठी कोणाच्याही होकाराची गरज नाही.”

सूत्रांनी सांगितले की, थरूर यांना निवडणुकीबाबत सोनियांच्या मनाचा अंदाज घ्यायचा होता. जी-२३ नेत्यांना असे वाटत आहे की, राहुल गांधींचा निवडणूक न लढवण्याचा विचार बदलण्यासाठीच पक्ष नेतृत्वाच्या इशाऱ्यावर प्रदेश कमिटींकडून ठराव मंजूर केले जात आहेत. सोमवारी, आणखी चार राज्यातील प्रादेशिक कमिट्यांनी राहुल गांधींना पक्षाध्यक्ष म्हणून पाठिंबा देणारे ठराव मंजूर केले आहेत. त्यात बिहार, जम्मू आणि काश्मीर, तामिळनाडू आणि महाराष्ट्र तसेच मुंबई प्रादेशिक काँग्रेस कमिटीचा समावेश आहे.

सोमवारी सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांचीही भेट घेतली. मिस्त्री यांनी त्यांना प्राधिकरणाने आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती दिली. सोनियांनी त्यांना निवडणूक मुक्त आणि निष्पक्ष राहील याची खात्री करण्यास सांगितले असल्याचे समजते.

बिहार प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा म्हणाले की, “राहुल यांना सर्वोच्च पदासाठी अनुकूल ठराव प्रदेश कमिटीने सोमवारी एकमताने मंजूर केला. हे ठराव राष्ट्र आणि पक्षाच्या हिताचे आहेत. राहुल गांधी यांना विनंती करणे हे आमचे काम आहे. कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे. मी ठरावावर उपस्थितांच्या सह्या घेतल्या आहेत आणि तो त्यांना पाठवत आहे. बाकी त्यांच्या हातात आहे.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress president election shashi tharoor tells sonia gandhi he may contest congress poll ashok gehlot may step in if rahul stays away sbp