बंगळूरु, वृत्तसंस्था
राज्याचे अंदाजपत्रक विचारात घेऊनच निवडणुकीत हमी किंवा आश्वासने द्या, असा सल्ला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र तसेच झारखंडमधील काँग्रेस नेत्यांना दिला आहे. काळजीपूर्वक विचार करा, अन्यथा भविष्यात आर्थिक अडचणी येतील. त्याचा परिणाम भविष्यातील पिढ्यांवर होईल, असा इशारा खरगेंनी दिला आहे.

पत्रकार परिषदेत त्यांनी वित्तीय शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. सरकारला जर आश्वासनपूर्तीमध्ये अपयश आले तर, प्रतीमा मलिन होईल तसेच विविध समुदायांना त्याचा त्रास सहन करावा लागेल असे त्यांनी नमूद केले. काँग्रेस सरकारने शक्ती योजनेचा फेरविचार करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर खरगे यांचे हे विधान महत्त्वाचे आहे. या योजनेनुसार महिलांना मोफत बसप्रवास सवलत आहे. अर्थात गुरुवारी कर्नाटकचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी या योजनेचा फेरविचार किंवा ती बंद करण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा : Yavatmal Assembly Constituency : चार उमेदवार पहिल्यांदाच लढणार विधानसभा; १० अनुभवी उमेदवारही रिंगणात

भाजपची टीका

काँग्रेस अध्यक्षांचा सल्ला पाहता आता राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे. खरगे यांनी पहिल्यांदा राहुल गांधी यांना याबाबत शिकवावे असा टोला भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी लगावला. राहुल गांधी हे प्रचारादरम्यान खटाखट पैसे देण्याची घोषणा करत होते अशी टीका प्रसाद यांनी केली. दिलेली आश्वासन पाळताना काँग्रेसशासित कर्नाटक, हिमाचल प्रदेश तसेच तेलंगणा सरकारची आर्थिक स्थिती बिकट झाल्याचे प्रसाद यांनी नमूद केले.

हेही वाचा :PM Narendra Modi: मोदींच्या सभांचा ८ नोव्हेंबरपासून धडाका

महाराष्ट्रातील नेत्यांनी सावधगिरी बाळगावी

महाराष्ट्रातील नेत्यांनी पाच, सहा, १० किंवा २० हमी जाहीर करू नयेत. अर्थसंकल्पावर आधारित आश्वासन द्या. अन्यथा दिवाळखोरीची स्थिती निर्माण होईल अशी तंबी त्यांनी राज्यातील नेत्यांना दिली. रस्त्यांसाठी जर निधी नसले, तर सारेजण विरोधात जातील. जर हे सरकार अपयशी ठरले, भविष्यातील पिढ्या माफ करणार नाहीत. दहा वर्षे त्यांना सत्तेबाहेर राहावे लागेल.