विरोधकांच्या इंडिया आघाडीतील मतभेदांनी सध्या टोक गाठलेले आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसने आमची इंडिया आघाडीशी जागावाटपावर चर्चा सुरू नसून आगामी लोकसभेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढवणार आहोत, असे जाहीर केले. सीपीआय (एम) ने मात्र आम्ही अजूनही इंडिया आघाडीसोबत आहोत, अशी भूमिका घेतली. त्याचाच एक भाग म्हणून राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेत सीपीआय (एम) चे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
बंगालमध्ये काँग्रेसचे फक्त दोन खासदार
तृणमूल काँग्रेसने आम्ही भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार नाही, असे सांगितले आहे. सीपीआय (एम) ने मात्र आम्ही पूर्ण क्षमतेने या यात्रेत सहभागी होऊ, अशी भूमिका घेतली. ही यात्रा येत्या बुधवारी मालदा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. तर गुरुवारी ही यात्रा मुर्शिदाबादमध्ये जाईल. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे फक्त दोन खासदार आहेत. तर बंगालच्या विधानसभेत काँग्रेस आणि डाव्या आघाडीचा एकही आमदार नाही.
“यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाले”
“आम्हाला या यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण मिळालेले आहे. आम्ही मालदा आमि मुर्शिदाबाद येथे यात्रेत सहभागी होणार आहोत. सुजान चक्रवर्ती मालदा येथे तर मी मुर्शिदाबाद येथे सहभागी होणार आहे,” असे सीबीआय (एम)चे राज्य सचिव मोहम्मद सेलीम यांनी सांगितले.
हेही वाचा >> इंडिया आघाडीला दुसरा धक्का, जागावाटपावर चर्चा चालू असताना समाजवादीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
मीनाक्षी मुखर्जी यांनादेखील निमंत्रण
सीपीआय (एम) च्या सूत्रांनुसार काँग्रेसच्या या यात्रेत सीपीआय (एम) चे तरुण नेते, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. आम्ही काँग्रेसोबत आहोत, हे सांगण्याचा यावेळी सीपीआय (एम) कडून प्रयत्न केला जाणार आहे. DYFI नेत्या मीनाक्षी मुखर्जी यांनाही या यात्रेचे निमंत्रण पाठवण्यात आलेले आहे. त्यादेखील या यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे.
‘काँग्रेसच्या यात्रेला आमचा नेहमीच पाठिंबा’
राहुल गांधी यांची ही यात्रा सिलिगुडीहून पुढे निघाल्यानंतर सीपीआय (एम)चे नेते जबेश सरकार या यात्रेत सहभागी झालेले दिसले. सीपीआय (एम)च्या भूमिकेविषयी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने अधिक माहिती दिली. “आम्ही काँग्रेसच्या या यात्रेला नेहमीच पाठिंबा दिलेला आहे. तृणमूल काँग्रेस या यात्रेत सहभागी होणार असेल तर आम्ही तेथे येऊ शकत नाही, असे आम्ही याअगोदरच स्पष्ट केलेले आहे. तृणमूलने या यात्रेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर या यात्रेत अडथळा निर्माण करण्याची तृणमूलची मानसिकता आहे. काही लोकांनी कूचबिहारमध्ये काँग्रेसच्या विरोधात पोस्टरबाजी करताना आम्ही पाहिलेले आहे. त्यामुळे मालदा आणि मुर्शिदाबाद येथे आमचे कार्यकर्ते या यात्रेत सहभागी होणार आहेत,” असे सीपीआय (एम)च्या नेत्याने सांगितले.
हेही वाचा >> तमिळनाडूत लोकसभेसाठी जागावाटपाचे सूत्र ठरले? डीएमके काँग्रेसला नऊ जागा देण्याची शक्यता
मालदा, मुर्शिदाबाद जिल्हे महत्त्वाचे
राजकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मालदा आणि मुर्शिदाबाद हे जिल्हे काँग्रेस आणि सीपीआय (एम) या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाचे आहेत. या दोन्ही पक्षांकडून अल्पसंख्याक मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे दोन्ही जिल्हे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचे ठरणार आहेत.
२०१६ आणि २०२१ सीपीआय (एम) -काँग्रेसमध्ये युती
याआधीही काँग्रेस आणि सीपीआय (एम) यांच्यात २०१६ आणि २०२१ सालच्या विधानसभा निवडणुकीत युती झालेली आहे. मात्र इंडिया आघाडी झाल्यानंतर सीपीआय (एम) आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसशी युती करणार नाही, असे मत सीपीआयएमचे आहे.
तृणमूलचा यात्रेत सहभागी न होण्याचा निर्णय
दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी २४ जानेवारी रोजीच आम्ही काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार नाही, असे स्पष्ट केले होते. ही यात्रा जेव्हा मालदा जिल्ह्यात प्रवेश करेल तेव्हा ममता बॅनर्जी राज्य सरकारच्या कार्यक्रमात असणार आहेत.