काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (२१ ऑगस्ट) काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. कोणत्याही समस्येचे निराकरण करणे आणि काँग्रेससाठी नेहमीच संकटमोचकाची भूमिका बजावण्यात अहमद पटेल यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या या संकट व्यवस्थापन कौशल्याची आठवण अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत असताना केली. तीन वर्षांपूर्वी करोना महामारीमुळे अहमद पटेल यांचे निधन झाले होते. त्यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या की, ज्याची जागा कुणीही भरून काढू शकत नाही असा सहकारी आम्ही गमावला आहे. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या आधारस्तंभांपैकी अहमद पटेल एक होते.

सोमवारी जयराम रमेश यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवर आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, “करोनाने अहमद पटेल यांचा बळी घेतला. त्याला आता तीन वर्षांचा काळ लोटला आहे. अनेक वर्षे अहमद पटेल काँग्रेस पक्षाचा आधारस्तंभ बनून काम करीत राहिले. स्वतःला मागे ठेवून, अतिशय नम्र आणि साध्या स्वभावाने त्यांनी सर्वच पक्षांत मित्रांचा गोतावळा तयार केला होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच कोणत्याही संकटाचा सामना करण्याची आणि संकटांना परतवून लावण्याची एक अगाध क्षमता होती. त्यांचे हे कौशल्य वादातीत होते. आम्हा सर्वांना आजही त्याचे स्मरण होते. ते माझ्यासहित अनेकांचे मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक होते.”

हे वाचा >> काँग्रेसचा असा चाणक्य ज्याच्या सल्ल्याशिवाय हलायचं नाही पान

काँग्रेस पक्षात अनेक वर्षे अहमद पटेल पडद्यामागून काम करणारे नेते म्हणून ओळखले जात होते. काँग्रेस पक्ष जेव्हा जेव्हा अडचणीत सापडला, तेव्हा तेव्हा त्यातून बाहेर येण्यासाठी अहमद पटेल यांच्याकडेच पक्षश्रेष्ठींचा ओढा असायचा. २०१९ साली महाविकास आघाडी प्रत्यक्षात आणण्यासाठी वैचारिक विरोधक शिवसेनेसोबत जुळवून घेणे, २०२० साली राजस्थान सरकार आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी पुकारलेले बंड शमविणे आणि १९९७ साली सीताराम केसरी यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्यास नकार दिल्यानंतर सोनिया गांधी यांना पक्षाध्यक्षपदी बसविण्यासाठी प्रणव मुखर्जी यांच्याशी केलेली मैत्री … असे अनेक प्रसंग आहेत; ज्यावेळी पटेल यांनी काँग्रेसची बुडती नौका वाचवली.

एका फोन कॉलवर राज्याची सत्ता वाचवली

पटेल हे २४ x ७ राजकारणी असल्याचे जयराम रमेश यांनी एकदा म्हटले होते. यावेळी जयराम रमेश यांनी पटेल यांची एक आठवण सांगितली. ते म्हणाले, “एकदा मध्यरात्री आम्हाला समजले की, उत्तर भारतातील एका राज्यातील आमचा मुख्यमंत्री दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व पाठीराख्या आमदारांसह पक्ष सोडणार आहे. पक्षाचे सरकार कोसळणार, असे स्पष्ट दिसत असताना अहमद पटेल यांनी त्या मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि ५० मिनिटे संवाद साधला. या ५० मिनिटांत पटेल यांनी विनोदी शैलीत त्या मुख्यमंत्र्यांना कुरवाळलं, हळुवार प्रेमाने समजावलं आणि एका फोन कॉलमध्येच सरकार वाचवलं.” जयराम रमेश सांगतात त्याप्रमाणे काँग्रेसमध्ये अशा प्रकारचा पराक्रम गाजविणारे आणि तरीही गाजावाजा न करता शांतपणे काम करणारे नेते फार नाहीत.

गुजरातमधील शेवटचे काँग्रेसी नेते

गुजरातमधील भरुच जिल्ह्यातल्या श्रीमंत शेतकऱ्याच्या घरात जन्मलेले अहमद पटेल युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात उतरले. १९७७ साली काँग्रेसचा देशभर पाडाव झालेला असताना त्यांनी भरुचमधून लोकसभेत विजय मिळवला. तेव्हापासून त्यांनी तीन वेळा लोकसभेचे आणि पाच वेळा राज्यसभेचे प्रतिनिधित्व केले. गांधी कुटुंबीयांच्या तीन पिढ्यांसह त्यांनी निष्ठेने काम केले. राजीव गांधी १९८५ साली पंतप्रधान असताना त्यांचे संसदीय सचिव म्हणून पटेल यांनी काम पाहिले. त्यानंतर सोनिया गांधी यांना त्यांनी विश्वासू सहकारी म्हणून सोबत दिली. बाबरी मशीद पाडल्यानंतर अहमद पटेल गुजरातमध्ये काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणून उदयास आले होते.

गुजरातमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर भाजपाने पटेल यांचा प्रभाव कमी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. १९८० सालच्या लोकसभा निवडणुकीची आठवणही यावेळी सांगितली जाते. अहमद पटेल यांना त्यावेळी बाबूभाई पटेल या नावाने ओळखले जात होते. मात्र, भाजपाने त्यांच्या खऱ्या नावाने पत्रके वाटली आणि फलक लावले. त्यातून निवडणुकीला जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला होता.

पडद्यामागचा सूत्रधार

पडद्यामागे राहून सूत्रे हलविण्यात पटेल यांचा चांगलाच हातखंडा होता. याचे मोठे उदाहरण म्हणजे २०१७ सालची राज्यसभा निवडणूक. राज्यसभेची पाचव्यांदा निवडणूक लढवीत असताना पटेल यांच्यासमोर अनेक आव्हाने होती. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते शंकरसिंह वाघेला यांनी डझनभर आमदारांसह पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांच्यापैकी बलवंतसिंह राजपूर यांना भाजपाने राज्यसभेचे तिसरे उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे केले होते. दोन जागा निवडून आणण्याचे संख्याबळ भाजपाकडे होते, यासाठी त्यांनी अमित शाह आणि स्मृती इराणी यांना उमेदवारी दिली. भाजपाने बलवंतसिंह यांना निवडणुकीस उभे करून अहमद पटेल यांच्या वाट्याची मते मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र पटेल यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांना कर्नाटकात नेले आणि थेट मतदानाच्या दिवशी सर्वांना विमानाने गुजरातमध्ये आणून राज्यसभेची निवडणूक जिंकली.

Story img Loader