पीटीआय, नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी निळ्या रंगाऐवजी लाल रंगाची संविधानाची प्रत का दाखवतात, असा सवाल करत काँग्रेसवर टीका करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला काँग्रेसने गुरुवारी प्रत्युत्तर दिले.n ‘‘हे तेच भारताचे संविधान आहे, ज्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नोव्हेंबर १९४९ मध्ये मनुस्मृतीची प्रेरणा घेऊन तयार केले नसल्याचा ठपका ठेवत आक्षेप घेतला होता. हीच ती भारताची राज्यघटना आहे, जी अजैविक पंतप्रधानांना बदलायची आहे,’’ अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली. संघाने ज्या राज्यघटनेवर हल्लाबोल केला होता, त्याच संविधानावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आक्षेप घेत असल्याचा आरोपही रमेश यांनी केला. भारतीय राज्यघटनेची लाल प्रत दाखवून राहुल गांधींना कोणता संदेश द्यायचा आहे, असा सवाल फडणवीस यांनी केल्यानंतर काँग्रेसने हा हल्लाबोल केला.
फडणवीस यांच्यावर टीका करताना रमेश म्हणाले, ‘‘देवेंद्र फडणवीस हताश होत आहेत. त्यांनी तथाकथित शहरी नक्षलवाद्यांचा पाठिंबा घेण्यासाठी राहुल गांधींनी राज्यघटनेची लाल प्रत दाखविल्याचा आरोप केला. मात्र हे तेच संविधान आहे, ज्याचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. देवेंद्र फडणवीस यांना हे माहीत असले पाहिजे की, त्या पुस्तकाला भारतातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असलेले के. के. वेणुगोपाल यांची प्रस्तावना आहे. वेणुगोपाल हे २०१७-२२ दरम्यान भारताचे महान्यायवादी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही यापूर्वी हे पुस्तक हाती घेतले होते,’’ असेही रमेश यांनी सांगितले.