राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसने पूर्ण देश पिंजून काढला. या यात्रेमुळे राहुल गांधी यांचे प्रतिमासंवर्धन होण्यास मदत झाली. यात्रेदरम्यान, हजारो लोक राहुल गांधी यांना भेटण्यासाठी तसेच पाहण्यासाठी गर्दी करायचे. दरम्यान, हे यश पाहता आता काँग्रेस या यात्रेच्या दुसऱ्या पर्वाला लवकरच सुरुवात करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर २०२३ आणि फेब्रुवारी २०२४ यादरम्यान, या यात्रेच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी तयारी सुरू झाली आहे.
राहुल गांधी यांच्याकडेच यात्रेचे नेतृत्व
पहिल्या पर्वाप्रमाणेच भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या पर्वाचे नेतृत्वदेखील राहुल गांधी हेच करणार आहेत. मात्र ही यात्रा पूर्णपणे पायी नसेल. यात्रेत सहभागी झालेले आपल्या सोईप्रमाणे पायी किंवा वाहनांचा वापर करतील. भारत जोडो यात्रेच्या पहिल्या पर्वाला ७ सप्टेंबर २०२२ रोजी तमिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरुवात झाली होती. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी तसेच त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी साधारण ४ हजार ८० किमी पायी प्रवास केला होता. जानेवारी २०२३ मध्ये या यात्रेची सांगता काश्मीरमधील श्रीनगर येथे झाली होती.
पहिल्या पर्वात १२ राज्यांतील ७५ जिल्ह्यांतून प्रवास
ही यात्रा एकूण १२ राज्यांतील ७५ जिल्ह्यांतून गेली होती. एकूण १२६ दिवस ही यात्रा चालली होती. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी वेगवेगळ्या राज्यातील लोकांशी संवाद साधला. लोकांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे, हा या यात्रेमागचा उद्देश होता. बेरोजगारी, असमानता, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा वेगवेगळ्या समस्यू समजून त्यावर उपाय शोधण्याचाही या यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला.
पी. चिदंबरम यांनी केले होते भाष्य
दरम्यान, सप्टेंबर २०२३ मध्ये काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांनी भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या पर्वासंदर्भात भाष्य केले होते. आम्ही भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या पर्वाची तयारी करत आहोत, असे चिदंबरम म्हणाले होते. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकारी समितीतील नेत्यांनीही राहुल गांधी यांना या यात्रेच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात करावी अशी विनंती केली होती. दुसऱ्या पर्वातील यात्रेचा मार्ग आता पूर्वेकडून पश्चिमेकडे असावा, असा सल्ला यावेळी कार्यकारी समितीतील नेत्यांनी दिला होता.