छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनानंतर ‘ ओबीसी’ मतपेढी भाजपला राखता आली. लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे झुकलेली मतपेढी विधानसभेत पुन्हा भाजपने ओढून घेतल्यानंतर काँग्रेसला समन्वायाची भूमिका घेणे अपरिहार्य होते. नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मस्साजोग येथून सुरू केलेल्या सद्भावना यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना बीड जिल्ह्यात नवा कार्यक्रम मिळाला. गेले अनेक दिवस जिल्हा पातळीवर काँग्रेस कार्यकर्त्यांना कार्यक्रमच नसल्याचे चित्र दिसून येत होते.

केवळ कमळ आणि घड्याळ हे दोनच झेंडे पाहणाऱ्या बीड जिल्ह्यात ‘भारत जोडो’ यात्रे सारखे वातावरण निर्माण करण्यास काँग्रेसला यश आल्याचे चित्र दिसून येत आहे.

मनोज जरांगे यांनी हाती घेतलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे सर्वाधिक पडसाद बीड जिल्ह्यात उमटले. नेकनूरसारख्या भागात जाती व्यक्ती नसेल तर सामान खरेदीवर बहिष्कार टाकण्याइतपत मजल गेली होती. पुढे हे वातावरण काहीसे निवळले. मात्र, मराठा विरुद्ध वंजारी असे चित्र गावोगावी निर्माण झाले होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये जातीय ध्रुवीकरणामुळे निर्माण झालेली दरी वाढतच होती. यात हस्तक्षेप करुन सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची गरज होती. यासाठी प्रशासनाला पुढाकार घ्यावा लागला.

बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी पोलीस दलातून अडनावे बाद करण्याचा निर्णय घेतला. अगदी पोलीस ठाण्यातील व्यक्तीची अडनावे पुसण्यात आली. प्रशासन जातीचा विचार करत नाही, असा संदेश गेला. मात्र, समाजातील जातीय जळमटे बाजूला करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेण्याचा कार्यक्रम आखला. मस्साजोग ते बीड या यात्रेस शनिवारी सुरुवात करण्यात आली. मात्र, या यात्रेच्या सुरुवातीच्या टप्प्यात जुने बडे नेते काही सहभागी झाले नाहीत. खासदार रजनीताई पाटील, अतुल लोढे ही मंडळी पदयात्रेत होती. याशिवाय दत्ता बारगजे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्तेही यात्रेत सहभागी झाल्याने वातावरण निवळण्यास मदत होईल असे मानले जात आहे. बारगजे यांनी मस्साजोग येथे २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण केले होते. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. तणाव कमी करताना तिरंगा उंचावला जात असल्याने काँग्रेसचा सद्भभावनेच्या हेतूवरही कोणी आक्षेप घेतले नाहीत.

या यात्रेत मराठवाड्यातील अनेकांना सहभागी करुन घेतल्याने काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आरक्षण मिळत नसल्याचा राग आणि भाजप नेत्यांविषयी असणारा रोष व्यक्त करत मतदार काँग्रेसकडे झुकला होता. विधानसभेत तो पुन्हा भाजपच्या बाजूने वळला. मात्र, मतपेढी घडविण्यासाठी संघटनात्मक कार्यक्रम एवढे दिवस नव्हते. सद्भावना यात्रेमुळे भारत जोडो नंतर काँग्रेस रस्त्यावर उतरत असल्याचा संदेश गेला आहे.

Story img Loader