नागपूर : काँग्रेसचा ओबीसी चेहरा असलेले विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये ओबीसी खात्याचे मंत्री म्हणून बजावलेली कामगिरी, सभागृहात आक्रमकपणे प्रश्न मांडण्याची शैली, पूर्व विदर्भात काही जिल्ह्यांत असलेला राजकीय प्रभाव आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात घेतलेली उघड भूमिका यामुळे पक्षश्रेष्ठीने त्यांच्या गळ्यात पुन्हा एकदा विरोधी पक्षनेतेपदाची माळ घातल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष व विरोधी पक्षनेते ही दोन्ही पदे ओबीसी समाजाकडे सोपवून काँग्रेसने या समाजाला निवडणुकीच्या आधी आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरोधी पक्षनेता कोण होणार याची चर्चा सुरू झाल्यावर या पदाच्या स्पर्धेत आपण असल्याचे वडेट्टीवार यांनी जाहीर केले होते. त्यासाठी ते दिल्लीवारी करूनही आले. मात्र, नाना पटोले या विदर्भातील ओबीसी नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद असल्याने विरोधी पक्षनेतेपदासाठी वडेट्टीवार यांच्या नावाचा विचार होण्याबाबत साशंकता होती. मात्र, पक्षाने वडेट्टीवार यांच्या बाजूने निर्णय देऊन एकप्रकारे पटोले यांना पक्षातून आव्हान उभे केले आहे.

हेही वाचा – गडचिरोली : देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्ग भूसंपादनात घोळ! ओलिताखालील जमीन कोरडवाहू दाखविल्याने आर्थिक झळ

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासोबत शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी आपले राजकीय वजन सातत्याने वाढवले. सोबत त्यांनी विधिमंडळ कामकाज आणि आयुधांचा अभ्यास केला. सोबतच आक्रमक बाणा कायम ठेवून प्रश्न मांडले. ओबीसी मंत्री म्हणून संधी मिळताच त्यांनी ओबीसी नेता म्हणून प्रतिमा तयार केली. या सर्व बाबी त्यांच्या पथ्यावर पडल्या आहेत. सध्या विधानसभेत विरोधी बाकावरील राष्ट्रवादी व शिवसेना या दोन प्रमुख पक्षात फूट पडल्याने व मोठा गट सत्तेत सहभागी झाल्याने काँग्रेसच संख्याबळाच्या आधारावर मोठा पक्ष उरला होता. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद या पक्षाकडे आले आणि विजय वडेट्टीवार यांना संधी मिळाली.

वडेट्टीवार हे ब्रम्हपुरी (जि. चंद्रपूर) विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असल्याने त्याचा फायदा काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीत विदर्भातील चिमूर-गडचिरोली व चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये वडेट्टीवार ओबीसी खात्याचे मंत्री होते. त्यांनी ओबीसी संघटनेच्या माध्यमातून या समाजाच्या विविध मागण्यांसाठी संघर्ष केला आहे. त्याचीही लाभ पक्षाला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते १९८०-१९८१ मध्ये एनएसयूआयच्या माध्यमातून झाली. ते १९९१-१९९३ या काळात गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य होते. नंतर ते शिवसेनेत गेले. या पक्षाकडून ते १९९८-२००४ मध्ये विधान परिषद सदस्य, २००४-२००५ आणि २००६-२००९ (पोटनिवडणूक) मध्ये चिमूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि याच मतदारसंघातून ते २००९ मध्ये विधानसभेत निवडून गेले. त्यानंतर २०१४ व २०१९ मध्ये ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले.

हेही वाचा – जि. प. उपाध्यक्ष संदीप ताले यांचा अखेर भाजपमध्ये पक्ष प्रवेश; दोन सदस्यांचाही प्रवेश

विरोधी पक्षनेतेपद आणि वडेट्टीवार यांचा असाही योगायोग !

भाजपने विरोधी पक्षनेता पळवायचा आणि रिक्त झालेल्या या पदावर काँग्रेसने विदर्भातील ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांना संधी द्यायची, असा योग वडेट्टीवार यांच्याबाबत दुसऱ्यांदा जुळून आला आहे. मजबूत विरोधी पक्ष लोकशाहीचा आधारस्तंभ मानला जातो, पण भाजपने महाराष्ट्रात विरोधी पक्षनेताच पळवण्याची परंपरा २०१४ पासून सुरू केली आहे. २०१४ ते २०१९ या दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तेव्हाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपमध्ये घेऊन मंत्री केले होते. तेव्हा रिक्त झालेल्या या पदावर वडेट्टीवार यांना प्रथम संधी मिळाली होती. आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार विरोधी पक्षनेते होते. ते सत्तेत सहभागी झाल्याने त्यांचे पद रिक्त झाले. यावेळीही पक्षाने दुसऱ्यांदा या पदासाठी वडेट्टीवार यांची निवड केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress strength to the obc community in maharashtra state president and opposition party leader from communities print politics news ssb