Congress : महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. २० नोव्हेंबरला निवडणूक आणि २३ नोव्हेंबरला निकाल. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. मात्र महाविकास आघाडीतल्या काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात ऑल इज नॉट वेल असं चित्र आहे. वांद्रे पूर्व येथील जागा वरुण सरदेसाईंना दिल्याने झिशान सिद्दिकी नाराज झाले आणि त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर सचिन सावंत यांनीही याच जागेची मागणी केली. आता मुंबईत नेमकं काय होणार ते आव्हान काँग्रेस ( Congress ) समोर आहे.

मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा आहेत

मुंबईत विधानसभा निवडणुकीचे ३६ मतदारसंघ आहेत. त्यापैकी १८ जागांची मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की लोकसभेला मुंबईत आमच्या पक्षाची कामगिरी चांगली होती. आम्ही एक जागा जिंकलो आहोत.

नाराजांची समजूत घालण्याचं आव्हान

काँग्रेसपुढे नाराजांची समजूत घालण्याचं मोठं आव्हान आहे. अनेक नेत्यांना असं वाटतं आहे की काँग्रेसच्या नेतृत्व असलेल्या जागा आपल्याकडे ठेवण्यात अपयशी ठरलं आहे. अस्लम शेख आण अमित पटेल हे विद्यमान आमदार आहेत त्यांना त्यांचे मतदारसंघ देण्यात आले आहेत. तर वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड यांना धारावी मतदारसंघातून तिकिट देण्यात आलं आहे. माजी आमदार नसीम खान यांना चांदिवलीतून तिकिट देण्यात आलं आहे.

शिवसेनेकडे असलेल्या जागा स्वतःकडे ठेवण्यात काँग्रेसला अपयश

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून भायखळा, वांद्रे पूर्व, वर्सोवा या जागा आपल्याकडे ठेवण्यात काँग्रेसला अपयश आलं आहे. वर्सोवा येथील जागा आपल्याकडे असली पाहिजे असं काँग्रेसला वाटत होतं.

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिममधून तिकिट देण्यात आलं आहे. मात्र त्यांनी काँग्रेस नेतृत्वाला विनंती केली आहे की मला ही जागा नको मला वांद्रे पूर्वेतून उमेदवारी द्या अशी विनंती केली आहे. त्यामुळे काँग्रेसपुढे आता नाराजांना रोखण्याचं आव्हान आहे. मी वांद्रे पूर्वेतून तिकिट मागितलं होतं. मात्र मला ते देण्यात आलं नाही. अंधेरी पश्चिम मतदारसंघातून मला तिकिट दिलं म्हणून मी आभार मानतो. पण नेतृत्वाने माझी ही जागा बदलावी असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. आम्ही सचिन सावंत यांनी विनंती हायकमांडला कळवली आहे असं सांगण्यात आलं आहे.

दुसरीकडे वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून आसिफ झकारिया यांना तिकिट देण्यात आलं आहे. त्यांना भाजपाच्या आशिष शेलारांच्या विरोधात तिकिट देण्यात आलं आहे. मात्र सूत्रांची माहिती समोर आली आहे की त्यांना ही जागा लढवण्यात काहीही रस नाही. त्यामुळे आता या सगळ्या नाराजीचं काँग्रेस काय करणार ? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.