गेल्या वर्षी झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत काँग्रेसला १८२ जागांपैकी केवळ १७ जागांवर विजय मिळवता आला. दरम्यान, या लाजीरवाण्या पराभवानंतर काँग्रेस पक्ष आता अॅक्शन मोडमध्ये आला असून काँग्रेसने पक्षाविरोधात काम करणाऱ्या ३८ नेते आणि कार्यकर्त्यांविरोधात कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले आहे.
हेही वाचा – “नितीश कुमारांची ‘समाधान यात्रा’ म्हणजे लोकांना मूर्ख बनवण्याचा…”, प्रशांत किशोर यांची बोचरी टीका
३८ नेत्यांवर काँग्रेसकडून कारवाई
यासंदर्भात बोलताना काँग्रेस नेते बाळूभाई पटेल म्हणाले, गुजरात विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या प्रदर्शनाबाबत आमचे मंथन सुरू आहे. या दरम्यान, आम्हाला ९५ जणांविरोधात पक्षविरोधी कारवाया केल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. यासंदर्भात या महिन्याच्या सुरुवातीला दोन वेळा शिस्तपालन समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आम्ही ३८ नेते आमि कार्यकत्यांविरोधात कारवाई करत त्यांना निलंबित केले आहे.
‘या’ आमदारांवर कारवाई
काँग्रेसने निलंबित केलेल्या ३८ नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या नेत्यांचाही समावेश आहे. सुरेंद्रनगरचे जिल्हाध्यक्ष हरेंद्र वालंद आणि नांदोडचे माजी आमदार पीडी वसावा यांनाही पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. तसेच पक्षातील आठ नेत्यांना कारण दाखवा नोटी बजावली असल्याची माहितीही बाळूभाई पटेल यांनी दिली आहे.
हेही वाचा – चर्चेतील चेहरा, के. चंद्रशेखर राव यांची राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार का?
१५६ जागांसह भाजपाचा दणदणीत विजय
दरम्यान, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत १८२ जागापैकी १५६ जागा जिंकत भाजपाने दणदणीत विजय मिळवला होता. तर काँग्रेसला १७ जागा आणि पहिल्यांदाच गुजरातमध्ये निवडणूक लढवणाऱ्या आम आदमी पक्षाला पाच जागावर समाधान मानावे लागले होते.