पीटीआय, नवी दिल्ली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ‘भगवान’ या वक्तव्यावर काँग्रेसने गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ‘नागपूर डागलेल्या अग्नी क्षेपणास्त्राने लोककल्याण मार्गाला लक्ष्य केले,’ अशा शब्दांत काँग्रेसने पंतप्रधानांना टोला लगावला.

झारखंडमधील गुमला येथे गुरुवारी ग्रामीण स्तरावरील कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी मानवाच्या महत्त्वाकांक्षेबाबत भाष्य केले. ‘‘काही लोक आधी सुपरमॅन (महापुरुष), त्यानंतर पूजनीय आणि नंतर देव बनू पाहत आहेत,’’ असे भागवत म्हणाले. भागवत यांनी पंतप्रधान मोदी यांचा नामोल्लेख केला नसला तरी हे वक्तव्य त्यांच्याबाबतच होते, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले. या विधानाला उचलून धरत काँग्रेसने पंतप्रधानांवर टीका केली. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी भागवत यांच्या विधानाची चित्रफीत शेअर करत समाजमाध्यमावर मोदींवर खोचक टीका केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपुरात असून ‘७ लोककल्याण मार्ग’ हे पंतप्रधानांचे निवासस्थान आहे. हाच धागा पकडून रमेश म्हणाले की, मला खात्री आहे की स्वयंघोषित अजैविक पंतप्रधानांना नागपूरने झारखंड येथून लोककल्याण मार्गावर डागेलेल्या या नवीन अग्नी क्षेपणास्त्राची खबर नक्कीच मिळाली असेल, असे रमेश यांनी सांगितले. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनीही समाजमाध्यमांवर पंतप्रधानांवर टीका केली.

हेही वाचा >>>शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात तक्रारी, भाजपच्या बैठकीत लोकसभा निकालावर मंथन; जागावाटप लवकर करण्याची मागणी

लोकसभा निवडणुकीदरम्यान एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना पंतप्रधान म्हणाले होते की, ‘‘मी आता या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, माझा जन्म जैविकदृष्ट्या झालेला नाही. मला ईश्वराने त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी पाठविले आहे.’’

मोहन भागवत काय म्हणाले?

गुमला येथे झालेल्या या कार्यक्रमात मोहन भागवत म्हणाले, ‘‘विकास आणि मानवी महत्त्वाकांक्षेला अंत नाही. काही जण माणूस असूनही त्यांच्यात मानवी गुण दिसत नाहीत. त्यांनी प्रथम हे गुण स्वत:मध्ये विकसित करणे आवश्यक आहे. पण मानवी गुण आत्मसात केल्यानंतर, मनुष्याला अलौकिक शक्तींनी युक्त असा ‘सुपरमॅन’ बनण्याची इच्छा असते. त्यानंतर आधी ‘देवत्व’ आणि मग ‘ईश्वरा’चा दर्जा मिळविण्याची अपेक्षा तो ठेवतो. मग त्याला सर्वोच्च शक्तीचे सर्वव्यापी रूप व्हायचे असते. पण त्यापलीकडे काय आहे, हे कोणालाच माहीत नसते. विकासाचेही तसेच असते. विकासाला अंत नाही. आपल्याला विकासासाठी अधिक वाव आहे, असा विचार केला पाहिजे. कार्यकर्त्यांनीही हे समजून घेतले पाहिजे. आपण नेहमी अधिक प्रयत्न केले पाहिजेत, असे सरसंघचालक म्हणाले.