गुजरातमध्ये काही दिवसांनी विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. त्यासाठी भाजपा आणि आप पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह सातत्याने गुजरातचा दौरा करत आहेत. तर, आपचे सर्वेसर्वा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही गुजरातमध्ये आश्वासनांची खिरापत वाटत आहेत. त्यामध्ये काँग्रेस पक्ष मागे पडल्याचं दिसत होते. त्यातच काँग्रेसने राज्यात ‘परिवर्तन संकल्प यात्रा’ काढणार असल्याचं जाहीर केलं आहे.

१८२ विधीमंडळ सदस्य असलेल्या गुजरात विधासनसभा निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नाही आहे. पण, गुजरातमध्ये वातावरण निर्मितीसाठी काँग्रेसने ‘भारत जोडो’च्या धर्तीवरच ‘परिवर्तन संकल्प यात्रे’ची घोषणा केली आहे. ३१ ऑक्टोंबरपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे.

हेही वाचा : गुजरातमध्ये विधानसभेपूर्वी ९०० अधिकाऱ्यांच्या बदल्या; निवडणूक आयोगाने का घेतला निर्णय?

गुजरात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते मनीष दोशी म्हणाले, “छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि कमलनाथ, ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक या पाच नेत्यांवर ‘परिवर्तन संकल्प यात्रे’ची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. हे नेते वेगवेगळ्या शहरातून ‘परिवर्तन संकल्प यात्रे’ला सुरुवात करतील.”

“अशोक गेहलोत गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर येथून यात्रेला सुरुवात करतील. भूपेंद्र बघेल खेडा जिल्ह्यातील फागवेल, दिग्विजय सिंह कच्छमधील नखतरणा, कमलनाथ सोमनाथ येथून तर, ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक हे जंबुसर ते दक्षिण गुजरात येथील ‘परिवर्तन संकल्प यात्रे’ला उपस्थित राहतील. यातील सर्व नेते एक आठवडा यात्रेत चालतील. ही यात्रा १८२ पैकी १७५ विधानसभा मतदारसंघातून प्रवास करेल. ‘परिवर्तन संकल्प यात्रे’ची संपूर्ण माहिती २९ ऑक्टोबरला समोर येईल,” असेही मनीष दोशी यांनी सांगितलं.

हेही वाचा : वंचितचा उद्धव ठाकरेंसह काँग्रेसपुढे मैत्रीचा हात; नव्या समीकरणासाठी गोळाबेरीज सुरू

दरम्यान, गुजरातमध्ये आप पहिल्यांदाच निवडणूक लढत आहे. त्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याबरोबर अन्य नेत्यांचे गुजरात दौरे वाढले आहेत. दोन्ही मुख्यमंत्री सातत्याने नागरिकांशी संवाद साधत असून, वीज, शिक्षण, आरोग्य हे मुद्यांवरून चर्चा करत आहेत. तर, यापूर्वी सत्ताधारी भाजपानेही ‘गुजरात गौरव यात्रे’चं आयोजन केलं होतं. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जंगी सभा घेतली होती.

Story img Loader