नागपूर : जग बदलेल पण कॉंग्रेस बदलणार नाही, चर्चेचे गुऱ्हाळ, हायकमांडची परवानगी, निवडणूक कार्य समितीची बैठक आणि त्यानंतर उमेदवारांची घोषणा. यात प्रचाराच्यादृष्टीने महत्वाचे सुरूवातीचे काही दिवस हातून जातात. इतकं सर्व करूनही नावे जाहीर होतात ती जुनीच. कॉंग्रेसच्या दुसऱ्या यादीतील नागपूर जिल्ह्यातील उमेदवारांची नावे पाहिली तर त्याचे वर्णन वरील प्रमाणेच करावे लागेल.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शनिवारी दुसरी यादी जाहीर केली.त्यात दक्षिण नागपूरमधून गिरीश पांडव,कामठीतून सुरेश भोयर आणि सावनेरमधून अनुजा केदार या तीन नावांचा समावेश आहे. यापैकी पांडव आणि भोयर हे २०१९ च्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार होते. दुसऱ्या क्रमांकावर असल्याने यंदाही तेच प्रबळ दावेदार होते. सावनेर मध्ये पक्षाचे नेते सुनील केदार यांच्यावर अपात्रेची कारवाई झाल्याने त्यांच्या जागेवरून त्यांच्या पत्नीलाच उमेदवारी मिळणार कारण हे निश्चित होते.पक्षाकडे दुसरा उमेदवारही नव्हता. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा पहिल्याच यादीत अपेक्षित होती. परंपरेनुसार कॉंग्रेसने चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच ठेवत आता घोषणा केली. आज( शनिवार) उद्या ( रविवार) सुटी आहे. म्हणजे सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नामांकन दाखल करणार. मुळात हीच नावे आधी जाहीर केली असती तर उमेदवार,पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांचा जीव टांगणीला लागला नसता.प्रचाराला वेग आला असता.पण म्हणतात ना से करेल ती कॉंग्रेस कसली?

हे ही वाचा… काँग्रेस नेत्यांमध्ये वाद, पक्षश्रेष्ठींचे ‘वेट अँड वॉच’; चंद्रपूर, बल्लारपूर, वरोऱ्यातील उमेदवारांची घोषणा लांबणीवर

दक्षिण, कामठीत २०१९ चीच लढत

२०१९ च्या निवडणुकीत दक्षिण नागपुरातून कॉंग्रेसचे गिरीश पांडव विरूद्ध भाजपचे मोहन मते अशी लढत झाली होती. पांडव यांचा पाच हजाराने पराभव झाला होता. यावेळी पांडव मागचा वचपा काढणार का ? हा प्रश्न आहे. कामठी मतदारसंघात २०१९ मध्ये सुरेश भोयर हेच कॉंग्रेसचे उमेदवार होते. त्यांची लढत भाजपचे टेकचंद सावरकर यांच्याशी झाली होती. त्यात भोयर पराभूत झाले होते. यंदा त्यांची लढत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी आहे. पाच वर्षांपूर्वी बावनकुळे यांना पक्षाने उमेदवारी नाकारली होती त्यामुळे त्यांचा मतदारसंघात संपर्क कमी झाला होता.

सावनेरमध्ये केदारी

अपात्रतेच्या कारवाईमुळे कॉंग्रेस नेते सुनील केदार हे त्यांच्या पारंपरिक सावनेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवू शकणार नसले तरी त्यांच्या पत्नी अनुजा केदार या उमेदवार असल्याने सावनेरात केदार विरूद्ध भाजप अशीच लढत होणार आहे.

हिंगणा, उमरेड पेच काम

जिल्ह्यातील हिंगणा आणि उमरेड या दोन मतदारसंघातील उमेदवार कॉंग्रेसने जाहीर केले नाही. हिंगणासाठी कॉंग्रेसने नागपूर पूर्व ही जागा राष्ट्रवादीला सोडली होती. उमरेड ही कॉंग्रेस कोट्यातच आहे.