All India Congress Committee in Gujarat : गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं ९९ जागा जिंकून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर महाराष्ट्र, हरियाणा, तेलंगणा व दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाला एकापाठोपाठ एक पराभवाचे धक्के बसले. या धक्क्यांमधून सावरत काँग्रेस पुन्हा एकदा नव्या जोमानं कामाला लागली आहे. या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी पक्षाचे नेते आतापासूनच कामाला लागले आहेत. त्याशिवाय गुजरातमधील गमावलेली सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेसनं खास रणनीती आखली आहे. आज व उद्या म्हणजेच ८ व ९ एप्रिलला गुजरातमध्ये काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. तब्बल ६४ वर्षांनी हे अधिवेशन होत असल्यानं त्याला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे.
गुजरातमध्ये तीन दशकांपासून भाजपाची सत्ता
तीन दशकांपासून काँग्रेसला गुजरातमध्ये विजय मिळवता आलेला नाही. पक्षानं अनेक प्रयत्न करूनही त्यांना राज्यात भाजपाचा पराभव करता आलेला नाही. असं असूनही काँग्रेसनं आतापासूनच मिशन २०२७ अंतर्गत गुजरात काबीज करण्याची तयारी सुरू केली आहे. तब्बल सहा दशकांनंतर गुजरातमध्ये काँग्रेसनं दोन दिवसीय अधिवेशन ठेवलं आहे. यापूर्वी १९६१ मध्ये भावनगर येथे काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं. दरम्यान, काँग्रेसच्या दोनदिवसीय अधिवेशनात पक्षाचे नेते राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करतील. तसेच सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात पक्षाला आलेलं दारुण अपयश आणि लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका यावरही विचारमंथन करणार आहेत.
“२०२७ मध्ये भाजपाचा पराभव करू”
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन वेळा गुजरातचा दौरा केला आहे. आता काँग्रेसच्या अधिवेशनासाठी ते पुन्हा एकदा गुजरातमध्ये मुक्काम ठोकणार आहे. आम्ही तुम्हाला (भाजपा) अयोध्येत हरवलं आहे आणि २०२७ मध्ये तुमचा गुजरातमध्येही पराभव करू, असं राहुल गांधी काही दिवसांपूर्वी आपल्या संसदेतील भाषणात म्हणाले होते. काँग्रेसच्या या अधिवेशनाच्या स्वागत समितीच्या अध्यक्षपदी शक्तिसिंह गोहिल यांची निवड करण्यात आली आहे; तर अमित चावडा यांच्याकडे संयोजकपद देण्यात आलं आहे. शक्तिसिंह गोहिल हे सध्या गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
काँग्रेसची पुढील रणनीती काय?
भाजपाकडून सरदार वल्लभाई पटेल यांच्या राजकीय वारशावर दावा केला जातो. मात्र, महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांनीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती, असं लोकांना पटवून सांगण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न होताना दिसून येत आहे. विशेष बाब म्हणजे चार महिन्यांपूर्वी काँग्रेसनं महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त बेळगाव येथे पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. ही बैठकही काँग्रेसच्या दीर्घ इतिहासातील महत्त्वाचे टप्पे आणि स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या प्रमुख भूमिकेची आठवण करून देण्यासाठी होती, असं राजकीय विश्लेषक सांगतात.
काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचं काय म्हणणं?
गुजरात हे राज्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा बालेकिल्ला आहे. तीन दशकांपासून भाजपानं राज्यात एकहाती सत्ता स्थापन केली आहे. अशा परिस्थितीत गुजरात काबीज करणं काँग्रेससाठी सोपं असणार नाही. त्यासाठी पक्षाला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसनं वेगवेगळ्या रणनीती आखाव्यात, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील आपले दौरे वाढवावेत, असा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सूर आहे. सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जे काही बोलतात, त्याला विरोध करण्याऐवजी जनतेला आवडतील असे प्रश्न उचलून धरावेत, असंही काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाचं म्हणणं आहे. लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळूनही इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये काहीशी दुफळी निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. या अधिवेशनात यावरही विचारमंथन केलं जाण्याची शक्यता आहे.
उदयपूरच्या चिंतन शिबिरात काय घडलं होतं?
२०२२ मध्ये काँग्रेसनं राजस्थानच्या उदयपूर शहरात पक्षाचं चिंतन शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात काँग्रेस पदाधिकारी, नेत्यांचं पक्षाला सोडून जाण्यापासून ते प्रत्येक निवडणुकीत होत असलेल्या पराभवावर चिंतन करण्यात आलं होतं. यावेळी देशभरातून आलेल्या काँग्रेस नेत्यांच्या भूमिका आणि सूचना जाणून घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर पक्षवाढीसाठी घेण्यात आलेले निर्णयामुळे काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला होता. उदयपूरच्या शिबिरातील काँग्रेसचे काही ठराव महत्त्वाकांक्षी होते. त्यामध्ये पक्षातील प्रत्येक पदाचा कार्यकाळ पाच वर्ष, एक व्यक्ती एक पद आणि कुटुंबातील एकालाच पद, ५० टक्के कार्यकर्त्यांचं वय ५० वर्षापेक्षा कमी असावं, असे निर्णय घेण्यात आले होते. त्यापैकी काही ठराव अमलात आणले गेले; तर काहींचा नंतर विचारच करण्यात आलेला नाही.
देशभरातील जिल्हा काँग्रेस कमिटी सदस्यांसोबत पक्षाच्या नेतृत्वाची अलीकडची बैठक झाली होती. या बैठकीतून कार्यकर्त्यांना चांगलं बळ मिळालं, असं काही जण सांगतात. मात्र, बैठकीतील काही सोपी उद्दिष्टंही अजून साध्य झालेली नाहीत. राष्ट्रीय स्तरावर तीन नवीन विभागांची निर्मिती करण्याची घोषणा, लोकांची पक्षाबाबत मतं जाणून घेण्यासाठी एक ‘पब्लिक इन्साइट विभाग’, निवडणुकीची आगाऊ तयारी सुनिश्चित करण्यासाठी एक राष्ट्रीय प्रशिक्षण संस्था आणि एआयसीसी निवडणूक व्यवस्थापन विभाग यांसारख्या उद्दिष्टांचा त्यात समावेश होता.
‘… अन्यथा अधिवेशन निरर्थक जाईल’
विशेष बाब म्हणजे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी २०२५ हे वर्ष पक्षासाठी संघटनात्मक सक्षमीकरणाचं वर्ष म्हणून घोषित केलं होतं. काँग्रेस पक्ष भाजपाचा राजकीय अजेंडा खोडून जनतेसमोर कोणते पर्यायी मॉडेल ठेवत आहेत, याबाबत आम्हाला काहीच माहीत नाही, असं पक्षातील एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं. “सरकारच्या प्रत्येक गोष्टीला विरोध न करता, काही गोष्टींचं पक्षानं समर्थनही केलं पाहिजे. अहमदाबादच्या अधिवेशनात पक्षनेतृत्वानं सर्वांसमोर नवीन दृष्टिकोन मांडला पाहिजे. पक्षाची नवीन दिशा काय आहे, हे वरिष्ठांनी समजून सांगायला हवं. तसे न झाल्यास हे अधिवेशन निरर्थक ठरेल”, अशी भीतीही काँग्रेस नेत्यानं व्यक्त केली.
काँग्रेस कोणकोणत्या प्रश्नांकडे लक्ष वेधणार?
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसनं नवीन रणनीती आखली आहे. त्यामध्ये, महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची स्थिती, शेतकऱ्यांचे, प्रश्न, सामाजिक न्याय, परराष्ट्र धोरण, संविधानावरील हल्ले, धर्माच्या आधारावरील राजकारण यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. हे सर्व मुद्दे काँग्रेस नेतृत्वाकडून बैठकीत मांडले जाणार आहेत. त्यावरून पक्षाची पुढची रणनीती ठरणार आहे. काँग्रेसच्या मसुदा समितीचे प्रमुख रणदीप सुरजेवाला मंगळवारी बैठकीत एक कार्यपत्रक सादर करतील, ज्यामध्ये सर्वव्यापी ठराव करायचा की मुद्दानिहाय वेगवेगळे ठराव घ्यायचे ते ठरवले जाईल.
काँग्रेसच्या एका दुसऱ्या नेत्याच्या मते, “पक्षाच्या रणनीतीत फारसे बदल होणार नाहीत. बहुतेक नेत्यांचा असा विश्वास आहे की, या अधिवेशनातून काहीही निष्पन्न होणार नाही. विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खचलं आहे. या अधिवेशनात प्रभावी भाषणं करून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरण्याचे पक्षनेतृत्वाचे प्रयत्न असतील. भाजपा व संघाचा राजकीय अजेंडा कसा खोडून काढावा याचे धडे काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांना दिले जातील. त्यामुळे पक्षाचं ढासळणारं मनोबल वाढू शकतं”, असंही ते म्हणाले.