नीलेश पवार
नंदुरबार : स्थापनेपासून गेली २५ वर्ष काँग्रेसची सत्ता राहिलेल्या डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्यात परिवर्तन झाले आहे. भाजपचे भरत गावित यांच्या नेतृत्वात कारखान्याच्या निवडणुकीत १४ जागा जिंकून परिवर्तन पॅनल विजयी झाले आहे. नवापूरचे कॉग्रेस आमदार शिरीष नाईक यांना हा जोरदार झटका मानला जात आहे. निवडणुकीत ते स्वत: पराभूत झाले असून माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांच्या पत्नी सायाबाई नाईक यांचाही पराभव झाला.
नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना सुरु झाल्यापासून काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता होती. पाच पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याने पहिल्यांदाच सहाव्या पंचवार्षिकसाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झाल्याने तब्बल २५ वर्षानंतर आदिवासी सहकारी साखर कारखान्यात सत्तांतर झाले. या निवडणुकीत दोन गावित परिवार नाईक परिवाराविरोधात एकत्र आले. नाईक परिवाराचे शेतकरी विकास पॅनल पराभूत झाले.
हेही वाचा: राजकारण असतं कसं ? रावसाहेब दानवे सांगतात तेव्हा…..
तत्कालीन मंत्री सुरुपसिंग नाईक आणि माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या नेतृत्वात पाच वेळा या सहकारी कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यंदा प्रथमच या कारखान्याची निवडणूक झाली. आणि सत्ताधाऱ्यांना चांगलाच झटका बसला. १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत दोन जागांवर आधीच काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे आरिफभाई बलेसरिया,अजित नाईक हे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. मागील विधानसभा निवडणूकवेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या भरत गावितांनी यंदा परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक यांच्या शेतकरी विकास पॅनलला पराभूत केले.
भरत गावितांना आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावितांचे मिळालेले भक्कम पाठबळ आणि नवापुरचे माजी आमदार शरद गावित यांचा निवडणुकीतील परिवर्तन पॅनलच्या बाजूने असलेला भक्कम पाठपुरावा यामुळेच भरत गावितांनी २५ वर्षांनंतर या साखर कारखान्यात सत्ता परिवर्तन करुन दाखविले आहे.
हेही वाचा: अजित पवार का चिडतात ?
बिनविरोध निवडलेल्या दोन जणांव्यतिरिक्त नवागाव गटातून विनोद नाईक हे शिरीष नाईक गटाचे एकमेव उमेदवार विजयी झाले. उर्वरीत १४ जागांवर भरत गावित गटाने विजय मिळविला. कारखान्याचा हा निकाल आगामी नवापूर नगरपालीका आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमदार शिरीष नाईक गटाला धोक्याची घंटा मानला जात आहे. कधी काळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या स्वत: गाळप हंगामाची सुरुवात करण्यासाठी या कारख्यान्यात आल्या होत्या.