कर्नाटकची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. आता काँग्रेसने राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तसेच तेलंगणा या राज्यांतील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी तयारी सुरू केली आहे. तेलंगणा राज्य जिंकण्यासाठी दिल्लीमधील काँग्रेसचे नेते तेथील स्थानिक नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. हे राज्य जिंकण्यासाठी काँग्रेसची रणनीती काय असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेसच्या आगामी वाटचालीसंर्भात भाष्य केले आहे. काँग्रेस पक्ष आगामी काळात भारत राष्ट्र समिती (बीआरएस), एमआयएम अशा कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
‘पूर्ण करता येतील, अशीच आश्वासनं देणार’
“प्रत्येक पक्ष आपल्या जाहीरनाम्यात वेगवेगळी आश्वासनं देत असतो. आम्ही हिमाचल प्रदेश, तसेच कर्नाटकमध्ये तेथील जनतेला काही आश्वासनं दिली होती. सत्तेत आल्यानंतर आम्ही या आश्वासनांची अंमलबजावणी करत आहोत. लोकांचा काँग्रेसवर विश्वास आहे. राज्याचा महसूल कसा वाढेल, याचा विचार आम्हाला करावा लागेल. आम्ही वास्तव लक्षात घेऊनच जनतेला आश्वासनं देणार आहोत. पूर्ण न करता येणारी आश्वासनं देऊ नका, असं आम्हाला वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं आहे. तसंच जी आश्वासनं दिली आहेत, ती पूर्ण केली पाहिजेत, असंही आम्हाला सांगण्यात आलं आहे,” असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
आम्ही घाईत कोणतंही आश्वासन देणार नाही : माणिकराव ठाकरे
“जनतेला आश्वासनं देण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना देण्याचं आम्ही स्थानिक नेत्यांना सांगितलं आहे. आम्ही घाईत कोणतंही आश्वासन देणार नाही. जे पूर्ण करता येईल, तेच आश्वासन आम्ही देणार आहोत. आम्हाला भविष्यातही अनेक निवडणुका लढायच्या आहेत. सत्तेत येण्याआधी अनेक आश्वासनं दिली आणि सत्तेत आल्यावर ती पूर्ण केली नाहीत, असं मत जनतेचं होणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत,” असेही माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणार का?
तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा करणार का, असा प्रश्न ठाकरे यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना “कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आम्ही आमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला नव्हता. निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय हायकमांड घेईल. सध्या आमच्या डोक्यात कोणत्याही नेत्याचं नाव नाही,” असे माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस पक्ष बीआरएसशी युती करणार का?
आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष बीआरएस पक्षाशी युती करणार का, असा प्रश्न ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना “बीआरएस पक्ष भाजपाची बी टीम आहे हे सर्वश्रुत आहे. बीआरएस पक्षाला पाटणा येथील विरोधकांच्या बैठकीसाठी आमंत्रण देण्यात आले होते; मात्र ते अनुपस्थित राहिले. संसदेतही बीआरएस पक्षाने आतापर्यंत भाजपाला पूरक भूमिका घेतलेली आहे. सध्या तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचाराने टोक गाठले आहे. महाराष्ट्रात बीआरएस पक्षाने प्रत्येक गावात पोस्टर्स लावली आहेत. या पक्षाकडे एवढा पैसा कोठून आला? ईडी, सीबीआय त्यांच्यावर कोणताही कारवाई करत नाही. दिल्लीतील मद्य घोटाळ्यात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र, याच प्रकरणातील कविता (के. चंद्रशेखर राव यांची कन्या) यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही,” अशी घणाघाती टीका माणिकराव ठाकरे यांनी केली.
बीआरएसने १० वर्षांत काहीही केलेले नाही : माणिकराव ठाकरे
“माझे मोदी यांच्यासोबत चांगले संबंध आहेत, असे केसीआर म्हणत असतात. मागील आठवड्यात पाटणा येथे विरोधकांची बैठक घेण्यात आलेली असताना दुसरीकडे केसीआर यांचे पुत्र के. टी. रामाराव यांनी दिल्लीमध्ये भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याची भेट घेतली होती. भाजपा आणि बीआरएस पक्षात संगनमत आहे. बीआरएसवर आता कोणीही विश्वास ठेवणार नाही. भविष्यात जेव्हा विरोधक एकत्र येतील, तेव्हा बीआरएस पक्ष भाजपाला मदत करील; मात्र लोक आता हुशार झाले आहेत. बीआरएसने १० वर्षांत तेलंगणामध्ये काहीही केलेले नाही. मेट्रो वगळता हैदराबाद हे शहर १०० वर्षांपूर्वीचे असल्यासाराखे वाटते,” असे माणिकराव ठाकरे म्हणाले.
असल्यासारखे वाटते,” असेही माणिकराव ठाकरे म्हणाले.
“एमआयएम पक्षासोबतही युती होण्याची शक्यता नाही. एमआयएम पक्षाची भूमिका काय आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही,” असेही माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले..