Amitabh Bachchan Allahabad Lok Sabha Result 1984: यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक फटका बसलेलं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशात २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला ६१ जागा मिळाल्या होत्या. यंदा त्यात घट होत थेट ३३ वर आल्या आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशामध्ये भारतीय जनता पक्षाला तब्बल २८ जागांचा फटका बसला. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील कोणत्या जागांवर भाजपाचा पराभव झाला, याचा आढावा आता घेतला जात असून त्यातलीच एक महत्त्वाची जागा म्हणजे अलाहाबाद!
जवळपास चार दशकांपूर्वी अलाहाबाद हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. पण ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात काँग्रेसच्या वर्चस्वाला या मतदारसंघात घरघर लागली. २०१४ पासून भारतीय जनता पक्षानं या मतदारसंघावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. पण आता पुन्हा भाकरी फिरली असून काँग्रेसनं हा मतदारसंघ आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे तब्बल ४० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर काँग्रेसला या मतदारसंघात पुन्हा विजय मिळाला आहे.
अभिनेते अमिताभ बच्चन आणि १९८४ ची निवडणूक!
१९८४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विक्रमी जागा मिळाल्या. यंदाच्या निवडणुकीत २४० जागा जिंकणाऱ्या भाजपाला १९८४ साली अवघ्या २ जागा जिंकता आल्या होत्या. त्याउलट काँग्रेसनं विक्रमी ४१४ जागांवर विजय मिळवला होता. १९८४ साली अमृतसरच्या सुवर्णमंदिरात राबवलेलं ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ आणि त्यानंतर झालेली इंदिरा गांधींची हत्या, यामुळे अवघ्या देशाची सहानुभूती काँग्रेस पक्षाच्या बाजूने झुकली. त्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष अक्षरश: वाहून गेले. आतापर्यंत एका पक्षाला इतक्या मोठ्या प्रमाणावर जागा जिंकता आलेल्या नाहीत. या निवडणुकीत काँग्रेसनं जिंकलेल्या जागांपैकी एक जागा अलाहाबादची होती. तिथून काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून घराघरांत पोहोचलेले अभिनेते अमिताभ बच्चन!
त्या निवडणुकीत अलाहाबादमधून अमिताभ बच्चन यांच्याविरोधात देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या लोक दल पक्षाचे उमेदवार हेमवती नंदन बहुगुणा हे निवडणूक लढवत होते (ते पुढे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले!). त्यात बहुगुणा यांना १ लाख ९ हजार ६६६ मतं मिळाली, तर अमिताभ बच्चन यांना २ लाख ९७ हजार ४६१ मतं मिळाली. त्यामुळे तब्बल १ लाख ८७ हजार ७९५ मतांनी अमिताभ बच्चन यांनी लोकदल पार्टीच्या उमेदवारावर विजय मिळवला होता. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार या निवडणुकीत तेव्हा तब्बल २६ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी २४ उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं.
दिग्गज काँग्रेस नेत्यांचाही पराभव!
दरम्यान, १९८४ च्या निवडणुकांनंतर अलाहाबाद लोकसभा मतदारसंघात अनेक दिग्गज नेत्यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यांना पराभवाचाच सामना करावा लागला. या उमेदवारांमध्ये अनिल शास्त्री, कमला बहुगुणा, सत्यप्रकाश मालवीय अशा नेत्यांचा समावेश होता. २०१४ सालापासून अलाहाबाद लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व राहिलं आहे. पहिल्या मोदी लाटेत श्याम चरण गुप्ता या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर २०१९ साली रिटा बहुगुणा यांनी विजय मिळवला होता.
स्वातंत्र्यकाळापासून अलाहाबादहून जिंकून आलेले खासदार…
१९५२ – श्री प्रकाश, काँग्रेस
१९५७ – लाल बहादूर शास्त्री, काँग्रेस
१९६२ – लाल बहादूर शास्त्री, काँग्रेस
१९६७ – हरिकृष्ण शास्त्री, काँग्रेस
१९७१ – हेमवती नंदन बहुगुणा, काँग्रेस
१९७७ – जनेश्वर मिश्रा, जनता पक्ष
१९८० – व्ही. पी. सिंह, काँग्रेस आय
१९८४ – अमिताभ बच्चन, काँग्रेस
१९८८ – व्ही. पी. सिंह, जनमोर्चा
१९८९ – जनेश्वर मिश्रा, जनता दल
१९९१ – सरोज दुबै, जनता दल
१९९६ – मुरली मनोहर जोशी, भारतीय जनता पार्टी
१९९८ – मुरली मनोहर जोशी, भारतीय जनता पार्टी
१९९९ – मुरली मनोहर जोशी, भारतीय जनता पार्टी
२००४ – रेवती रमण सिंह, सपा
२००९ – रेवती रमण सिंह, सपा
२०१४ – श्यामा चरण गुप्ता, भाजपा<br>२०१९ – रिटा बहुगुणा, भाजपा
२०२४ – उज्ज्वल रमण सिंह – काँग्रेस
भाकरी फिरली, काँग्रेसची प्रतीक्षा संपली
यंदाच्या निवडणुकीत तब्बल ४० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर काँग्रेसला या मतदारसंघात पुन्हा विजय मिळवता आला आहे. उज्ज्वल रमण सिंह हे काँग्रेसकडून अलाहाबादमधून जिंकून आले आहेत. ५१ वर्षीय सिंह हे समाजवादी पक्षाच्या दिग्गज नेत्या आणि दोन वेळा अलाहाबादमधूनच खासदार म्हणून निवडून आलेल्या रेवती रमण सिंह यांचे पुत्र आहेत. तसेच ते प्रयागराज जिल्ह्यातील कर्चना मतदारसंघाचे विद्यमान आमदारही होते. त्यांच्यासमोर भाजपाचे उमेदवार नीरज त्रिपाठी यांचं आव्हान होतं. पण उज्ज्वल रमण सिंह यांनी त्रिपाठी यांचा ५८ हजार ७९५ मतांनी पराभव केला. सिंह यांना ४ लाख ६२ हजार १४५ मतं मिळाली असून त्रिपाठी यांना ४ लाख ३ हजार ३५० मतं मिळाली.
शपथविधी समारंभाचा इतिहास कुठून सुरु होतो? भारतात कधीपासून सुरु झाली शपथविधीची प्रथा?
निवडणुकांच्या आधी सिंह यांचा पक्षबदल!
दरम्यान, आई रेवती रमण सिंह यांच्याप्रमाणेच उज्ज्वल रमण सिंह हेही समाजवादी पक्षाचेच निष्ठावंत नेते होते. मात्र, निवडणूकपूर्व जागावाटपामध्ये अलाहाबादची जागा काँग्रेसच्या पारड्यात पडली. त्यामुळे उज्ज्वल रमण सिंह यांनी सपामधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला व ते अलाहाबादचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार झाले. या पक्षबदलामुळेच अलाहाबादची जागा ४० वर्षांनंतर काँग्रेसच्या नावावर झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
अलाहाबाद मतदारसंघ आणि काँग्रेसचं नातं
स्वातंत्र्योत्तर काळापासून अलाहाबाद मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. १९८४ साली अमिताभ बच्चन यांना काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळाला असला, तरी त्याआधी काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी या मतदारसंघातून निवडणुका लढवल्या आणि जिंकल्यादेखील आहेत. देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांनी १९५७ आणि १९६२ साली या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली होती. शास्त्रीजींच्या निधनानंतर १९६६ साली त्यांचे पुत्र हरिकिशन शास्त्री यांनीही अलाहाबादमधून निवडणूक जिंकली होती.
काँग्रेसला १९८४ साली अलाहाबादमध्ये विजय मिळवून देणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी पुढे बोफोर्स प्रकरणात सहभागाचा आरोप झाल्यानंतर खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला. पुढे त्यांचे सपाचे तत्कालीन अध्यक्ष अमर सिंह यांच्याशी सूत जुळले आणि कायम राहिले. जया बच्चन यांनी सपामध्ये प्रवेश केला आणि त्या सपाच्या राज्यसभेतील खासदार म्हणूनही काम करू लागल्या. पण राजीनाम्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या राजकीय कारकिर्दीला जसा पूर्णविराम लागला, तसाच अलाहाबादमधील काँग्रेसच्या अस्तित्वालाही तो लागला. पण आता ४० वर्षांनी पुन्हा एकदा अलाहाबादमधून निवडून आलेला काँग्रेसचा खासदार संसदेत प्रवेश करणार आहे!