सांगली : नेतृत्वहिनतेमुळे हवालदिल झालेले काँग्रेस कार्यकर्ते पर्यायाच्या शोधात आहेत. ही संधी साधून आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका नजरेसमोर ठेवत जनसुराज्य शक्ती या पक्षात कार्यकर्त्यांनी प्रवेशाचा धडाका लावला आहे. जनसुराज्य पक्ष विस्तारत असताना महायुतीतील मित्र पक्षांना याची तोशीस नाही, मात्र विरोधक असलेल्या आणि गाफील राहिलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना जनसुराज्य हा आधार वाटत असून याची काँग्रेसला काडी मात्र दखल घ्यावी असे वाटत नाही.
काँंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत झालेल्या बंडखोरीवरच अद्याप आगपाखड करण्यात मग्न आहेत, तर जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत पराभवाची कारणमीामांसा न करता जत सोडून आपले कार्यक्षेत्र जिल्हा आहे हेच विसरून गेले आहेत. पक्षाचे नेते आ. विश्वजित कदम केवळ मतदार संघाचेच नेते असल्यासारखे पलूस-कडेगाव वगळून बाहेर पडायला तयार नाहीत. तर खा. विशाल पाटील यांनी काँग्रेसची ताकद वापरून अपक्ष म्हणून मैदानात उतरून खासदारकी मिळवली. पण त्यांचा राबता आता सत्ताधारी नेत्यासोबत आणि मंत्र्यासोबतच अधिक आहे. दिल्लीत संसदेत विरोधक म्हणून ते भूमिका बजावत असले तरी स्थानिक पातळीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले स्नेह जुळले आहेत. यातूनच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना भाजप प्रवेशाची खुली ऑफरही दिली होती.
काँग्रेस नेत्यांमधील या बेदिलीमुळे सामान्य कार्यकर्ता अस्वस्थ झाला आहे. त्यांना भाजपसोबत जायचे नाही, मात्र, नेते मंडळी जर सोयिस्कर भूमिका घेत असतील तर आपण काय करायचे ही चिंता त्यांना ग्रासते आहे. महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार असे गृहित धरले तरी तोपर्यंत आपला प्रभागाची मतदार संघाची बांधणी करणे गरजेचे आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर असलेल्या नेत्यांची जवळीक महत्वाची वाटते. आजच्या घडीला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष पुन्हा एकदा दुष्काळी फोरमच्या धर्तीवर आपली ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात असताना काँग्रेस शांत आहे. ही शांतताच काँग्रेसच्या मूळावर उठते की काय अशी स्थिती असली तरी नेतेमंडळींना याची चिंता नाही, कारण आता तातडीने त्यांच्या अस्तित्वाच्या लोकसभा विधानसभा निवडणुका नाहीत. यामुळे काँग्रेसमध्ये सुस्तावलेपणा आला आहे.
राजकीय पक्षात वरिष्ठ पातळीवरच्या नेतेमंडळींचे फारसे अडतही नाही, मात्र, दुय्यम स्थानावर असलेल्या कार्यकर्त्याना आश्वासक नेतृत्वाची गरज दैनंदिन कामासाठी असते. पोलीस ठाणे, ग्रामपंचायत, चावडीतील कामासाठी एखाद्या आमदार, खासदारांचा फोन जाणे महत्वाचे आणि मोलाचे ठरते. मात्र, या कामासाठीही नेतेमंडळी भेटेना झाली तर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होते. ही अस्वस्थता सध्या काँग्रेसमध्ये निर्माण झाली आहे. जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरण्याची मानसिकताच ऐतिहासिक परंपरा सांगणार्या काँग्रेसची उरली नाही की काय अशी शंकास्पद स्थिती आहे. यातून गाव पातळीवर महत्वाची भूमिका बजावलेले कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत. यातून त्यांना सत्तेत असूनही आपली अडचण दूर करणारा पक्ष म्हणून जनसुराज्य शक्ती हा पक्ष आश्वासक वाटत आहे.
यामुळे काँग्रेसचे माजी मिरज तालुकाध्यक्ष अमर पाटील, बेडगचे ग्रामपंचायत सदस्य कैलास पाटील, वड्डी ग्रामपंचायतीचे सदस्य, सोनीचे अरविंद पाटील, कर्नाळचे नासिर चौगुले, मिरजेचे सलिम मालगावे आदींसह विकास सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करते झाले. प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असून हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसला इशारा मानला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवून आणि आ. विनय कोरे यांच्या आश्वासक नेतृत्वाचा फायदा गावच्या विकासासाठी करून घेण्याची तयारी कार्यकर्त्यांनी दाखवली. अशा कार्यकर्त्यांना आधार देउन कार्यरत करणे गरजेेचे आहे. नजीकच्या काळात आणखी काही नेते पक्ष प्रवेश करतील-समित कदम, प्रदेशाध्यक्ष जनसुराज्य शक्ती.