येत्या १२ नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार आहे. मात्र, अद्यापही काँग्रेसने मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. तसेच काँग्रेसच्या जवळपास २६ नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपाची वाट धरली आहे. त्यामुळे ऐन निडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला संकटांचा सामना करावा लागतो आहे.
हेही वाचा – हिमाचल प्रदेशमध्ये मतदानाच्या चार दिवस आधी काँग्रेसला मोठा धक्का, २६ नेत्यांचा राजीनामा; भाजपात प्रवेश!
काही दिवसांपूर्वी हिमाचलमध्ये भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही यावरून काँग्रेसला टोला लगावला होता. काँग्रेसकडे सध्या मुख्ममंत्री पदासाठी आठ उमेदवार आहेत, असं ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेसनेही त्याला प्रत्त्युत्तर दिले. काँग्रेस हा एक लोकशाही मानणारा पक्ष आहे. आमच्या पक्षात कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतं. तुम्ही केवळ आठ उमेदवार म्हणता, मात्र आमच्याकडे त्यापेक्षा जास्त उमेदवार आहेत, असे प्रत्त्युतर काँग्रेसचे माजी आमदार सुधीर शर्मा यांनी दिले.
हेही वाचा – हिमाचल प्रदेश निवडणूक : ‘चुराह’ मतदारसंघात सत्ताविरोधी लाट; भाजपासाठी निवडणूक कठीण?
दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदासाठी सुखविंदर सिंग सुखू, मुकेश अग्निहोत्री आणि प्रतिभा सिंग हे तीन उमेदवार आहेत. मात्र, पक्षातील अंतर्गत गटबाजी टाळण्यासाठी काँग्रेसतर्फे उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येत नसल्याची शक्यता आहे.
हे तीन नेते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत
- सुखविंदर सिंग सुखू
मध्य हिमाचलमधील नादौन मतदारसंघातून निवडणूक लढवणारे सुखू हे पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि सध्याच्या प्रचार समितीचे प्रमुख आहेत. काँग्रेस जिंकल्यास मुख्यमंत्रीपदाच्या प्रमुख्य दावेदारांपैकी ते एक आहेत.
- मुकेश अग्निहोत्री
मुकेश अग्निहोत्री हे विरोधी पक्षनेते आहेत. ते दक्षिण-पश्चिम हिमाचलमधील हरोली येथून निवडणूक लढवत आहेत. २००३ मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले होते. २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड केली होती.
- प्रतिभा सिंग
हिमाचल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्या पत्नी खासदार प्रतिभा सिंह यासुद्धा मुख्यमंत्री पदाच्या दावेदार आहेत.