चंद्रशेखर बोबडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : राजकीय पक्षबांधणीसाठी लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करणे जसे गरजेचे असते तसेच पक्षाचे कार्यक्रम राबवण्यासाठी नियोजन व व्यवस्थापनही महत्त्वाचे असते. काँग्रेसचे युवा नेते नितीन कुंभलकर पक्षकार्याचे नियोजन व निवडणूक व्यवस्थापन यावर अधिक भर देणारे आहेत. त्यांच्यातील व्यवस्थापन कौशल्य पाहूनच राहुल गांधी यांनी त्यांच्या विशेष चमूमध्ये निवड केली.

विद्यार्थी जीवनापासूनच. युवक काँग्रेसमध्ये काम करताना नितीन कुंभलकर यांच्यातील नियोजन कौशल्याची ओळख पक्षातील वरिष्ठ नेत्यांना झाली. त्यामुळे त्यांच्यावर २००६ मध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस समितीच्या प्रेरणा यात्रेचे विदर्भातील नियोजनाचे काम सोपवण्यात आले. या यात्रेचे त्यांनी केलेले नियोजन व त्याची अंमलबजावणी पाहून पक्षाचे नेते प्रभावित झाले. त्यांच्या यात्रेतील उत्कृष्ट नियोजनाबद्दल त्यांचा सर्वोत्कृष्ट राज्य पदाधिकारी म्हणून प्रदेश युवक काँग्रेसने गौरव केला होता.

हेही वाचा: अजित पवार का चिडतात ?

राहुल गांधी पक्षबांधणीसाठी युवकांचा शोध घेत असताना त्यांचे लक्ष नितीन कुंभलकर यांच्यावर गेले. त्यांनी नितीन यांचा आपल्या चमूमध्ये त्यांचा समावेश केला. कालांतराने त्यांच्यावर राहुल गांधी यांच्या विविध राज्यांतील सभा आणि दौऱ्याच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली. व्यवस्थापन कौशल्यामुळे नंतरच्या काळात त्यांना अ.भा. युवक काँग्रेस तसेच अ.भा. काँग्रेस समितीने त्यांच्यावर अनेकवेळा पक्षबांधणीसाठी राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली.

हेही वाचा: राजकारण असतं कसं ? रावसाहेब दानवे सांगतात तेव्हा…..

उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात सलग तीन वेळा (२००७, २०१२, २०१७) तेथील विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्यावर विविध मतदारसंघांची जबाबदारी टाकली. २०१८ मध्ये मध्यप्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी अ.भा. काँग्रेसचे विभागीय समन्वयक म्हणून काम केले. दिल्लीच्या राजकारणात सक्रिय असूही नितीन यांची स्थानिक कार्यकर्त्यांशी नाळ जुळून आहे. संघटन कौशल्य व पक्षनिष्ठा या त्यांच्या जमेच्या बाजू ठरतात.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress youth leader nitin kumbhalkar more focused party work planning and election management rahul gandhi chose in special team print politics news tmb 01