नांदेड : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भोकर विधानसभा मतदारसंघात घटलेल्या मताधिक्यामुळे खासदार अशोक चव्हाण व त्यांच्या कुटुंबाची चिंता वाढलेली असतानाच या मतदारसंघातील मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाला मतदारांची आश्वासक साथ मिळाल्याननंतर मुदखेड तालुक्यातील पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावास भेट आणि ग्रामस्थांसाठी ऋणनिर्देश पत्र हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
वरील मतदारसंघ मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आणि मग आपल्या समर्थकांच्या माध्यमातून भाजपा उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळवून देण्याचे नियोजन त्यांनी केले होते. पण त्यांच्या या नियोजनास मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यातील काँग्रेसच्या नवख्या पण निश्चयी प्रचारकांनी मोठा ब्रेक लावला. चव्हाण भाजपात आले, तरी भाजपाला नाममात्र आघाडी मिळाली.
चव्हाण व त्यांचे समर्थक भाजपात गेल्यानंतर मुदखेड तालुक्यात उपेक्षित राहिलेल्या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या प्रचारात महत्त्वाचे स्थान मिळाले. बारडच्या प्रताप देशमुख आणि संदीपकुमार देशमुख या दोघांनी इतर तरुण कार्यकर्त्यांना सोबत घेत मुदखेड तालुक्यातील प्रचार यंत्रणा सांभाळली. त्यांच्या कार्यक्षेत्रातील बहुसंख्य गावे काँग्रेससाठी अनुकूल होतीच, ती तशीच राहावीत यासाठी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांनी दिवसरात्र काम केले.
हेही वाचा >>> पराभवानंतर सांगली भाजपमध्ये संशय अधिक बळावला
निवडणुकीमध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण अपेक्षेप्रमाणे विजयी झाले. दोन दिवसांपूर्वी त्यांनी खासदार या नात्याने भोकर शहराला पहिली भेट दिली. या दौर्यात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत झाले. या दरम्यान बारडच्या देशमुखद्वयांनी तालुका काँग्रेस समितीच्या शीर्षपत्रावर वेगवेगळ्या गावांतल्या ग्रामस्थांना उद्देशून एक ऋणनिर्देश पत्र तयार करून घेतले. हे पत्र सोबत ठेवतच त्यांनी गावभेटीचा कार्यक्रम आखला आहे. या उपक्रमाची सुरुवात तिरकसवाडी या गावाला भेट देऊन गुरुवारी करण्यात आली. आपले ऋणनिर्देश पत्र त्यांनी तिरकसवाडीचे सरपंच ज्ञानेश्वर गावडेवाड व माजी पोलीस पाटील तानाजी खुपसे यांच्याकडे सुपूर्द केले.
आपल्या गावच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी सदैव आपल्या पाठीशी आहे. गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच ग्रामस्थांचे कोणतेही शासकीय काम मार्गी लावण्यासाठी आम्ही आपल्यासोबत आहोत. गावातील प्रत्येक कुटुंबाच्या उन्नतीसाठी विधायक मार्गाने आम्ही झटत राहू, अशी ग्वाही या ऋणनिर्देश पत्रात देण्यात आली आहे.
हेही वाचा >>> दोन मुख्यमंत्र्यांची अशीही ‘घराणेशाही’ !
निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजपाने अर्धापूर, मुदखेड आणि भोकर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर धनशक्तीचा प्रयोग केला. पण अनेक स्वाभिमानी सरपंचांनी आर्थिक मोहाला बळी न पडता शंकरराव चव्हाण यांच्या विचारांच्या बाजूने राहण्याची भूमिका घेतली, असे संदीपकुमार देशमुख यांनी काही ठिकाणच्या अनुभवातून सांगितले. ज्या गावांनी काँग्रेसला आघाडी दिली; तेथे आम्ही जाणार आहोतच, पण ज्या गावांमध्ये काँग्रेसला आघाडी मिळाली नाही, त्या गावांमध्ये जाऊनही सरपंचांना ऋणनिर्देश पत्र दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भोकर मतदारसंघात आता विधानसभा निवडणुकीचेही वारे वाहू लागले आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेला झटका लक्षात घेऊन भाजपा नेते या मतदारसंघात आणखी जोर लावण्याची शक्यता आहे. मतदारांवर नांदेडमधून उमेदवार लादला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी भोकर मतदारसंघाचा भूमिपुत्रच आमदार असला पाहिजे, अशी भूमिका जाहीर करून आपली मोहीम सुरू केली आहे.
© The Indian Express (P) Ltd