Meghalaya Assembly Election 2023: मेघालय विधानसभा निवडणूक २०२३ मध्ये नॅशनल पीपल्स पार्टी बहुमतापासून अतिशय थोड्या फरकाने दूर राहिली असली तरी त्यांच्या एनपीपी (National Peoples Party) या पक्षाला २६ मतदारसंघांत विजय मिळाला आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत एनपीपीचे २० आमदार होते. यावेळी त्यात वाढ झालेली दिसते. पक्षाला मिळालेल्या या विजयाच्या वाट्यामध्ये पक्षाचे तरुण तडफदार नेते आणि मुख्यमंत्री कोनराड संगमा यांचा मोलाचा वाटा आहे. एनपीपीला यावेळच्या निवडणुकीत चांगल्या जागा मिळाल्या असल्या तरी मागचा पाच वर्षांचा सत्ताकाळ त्यांच्यासाठी सोपा नव्हता. अनेक आघाड्यांवर त्यांना संकटांना तोंड द्यावे लागले. राज्यातील दबावगटांसमोर मवाळ भूमिका घेतल्यामुळे संगमा यांच्यावर बरीच टीका झाली. तसेच राज्य सरकारवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोपदेखील करण्यात आले. तरीही यावेळी एनपीपीला जास्त जागा मिळाल्या याचा अर्थ मेघालयमधील समकालीन राजकीय नेतृत्वात संगमा यांचे स्थान उंचावले आहे असे दिसते.
कोण आहेत कोनराड संगमा?
कोनराड संगमा २००८ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले, इथूनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली. कोनराड यांचे वडील आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष पूर्णो संगमा यांच्या देखरेखीखाली कोनराड यांनी काम सुरू केले. फायनान्समध्ये एमबीए झालेले कोनराड यांनी २००९ साली अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर, २००९ ते २०१३ पर्यंत ते काँग्रेस नेते मुकुल संगमा यांच्या सरकारच्या काळात कोनराड यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिले. २०१५ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने गारो हिल्स जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवला. पुढच्याच वर्षी पूर्णो संगमा यांचे निधन झाल्यानंतर कोनराड यांनी पक्षाची सूत्रे स्वतःच्या हातात घेतली. २०१६ साली ते तुरा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत विजयी होऊन लोकसभेत गेले. २०१८ साली कोनराड यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन विधानसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाकडे राजकीय जुगार म्हणून पाहिले गेले. कोनराड यांनी धोका पत्करला, पण त्याचा त्यांना फायदा झाला. कोनराड पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले.
कोनराड यांच्या नेतृत्वाखाली एनपीपीचा झपाट्याने विस्तार होत आहे. मणिपूर विधानसभेतही एनपीपी पक्षाचे आमदार आहेत. तिथे भाजपानंतर सर्वाधिक आमदार असणारा एनपीपी हा एक पक्ष आहे. अरुणाचल प्रदेशमध्येही एनपीपीचे चार आमदार आहेत. एनपीपीची वाढ ही काही अंशी भाजपाच्या मदतीनेही झाली आहे. केंद्रातील एनडीआचा घटकपक्ष म्हणूनही एनपीपी काम करतो. तरीही सीएए वरुन कोनराड यांनी भाजपाशी दोन हात करण्यास मागे-पुढे पाहिले नाही. नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोनराड यांनी भाजपावर जाहीरपणे हल्लाबोल केला. राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोनराड यांनी भाजपाला लक्ष्य करून ते राज्यातले मोठे पुढारी असल्याचे दाखवून दिले.
या निवडणुकीचे सार असे की, कोनराड यांच्या कलाने अनेक गोष्टी घडल्या आहेत. मेघालयचे निकाल हाती आल्यानंतर काही तासांतच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी ट्वीट करत एनपीपीला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. कोनराड यांनी मात्र अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत. मेघालयमध्ये कमी पर्याय आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही. कोनराड यांचे संख्याबळ पाहता कुणाला सोबत घ्यायचे आणि कुणाला नाही, याचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहेत.