कल्याण – डोंबिवली प्रकरण आणि शिवसेनेच्या जाहिरातीमुळे डिवचलेल्या भाजप नेत्यांनी ठाणे जिल्ह्यातील आपले भक्कम वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आता जाहीर सभा, नागरिकांच्या भेटीगाठींची जोेरदार मोहीम सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या खासदार सुपुत्राला ठाणे जिल्ह्यातील भाजपची ताकद दाखविण्यासाठी असे कार्यक्रम तालुका, गावपातळीवर घेण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजपच्या एका नेत्याने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील वर्षभरापासून शांत आणि संयमाची भूमिका घेतलेल्या भाजपच्या नेते, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या आक्रमक पद्धतीला आता तेवढ्याच ताकदीने उत्तर देण्याचे भाजपच्या जिल्हा नेत्यांनी ठरविले आहे. या हालचालींना वरिष्ठ नेत्यांची फूस असल्याचे कळते. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांचा विकास कामांच्या नस्तींमध्ये अडथळे आणणे, कल्याण डोंबिवली परिसरात फक्त शिवसेनाच विकास कामे करते. हे दाखविण्याचा शिवसेनेचा गेल्या वर्षभरापासूनचा आक्रमक प्रयत्न आता भाजप पदाधिकारी, नेत्यांनी हाणून पाडण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – अकोल्यात प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस एकत्र येणार का ?

डोंबिवलीतील भाजपचे नंदू जोशी यांच्यावरील विनयभंगाचा गुन्हा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहिरातींच्या माध्यमातून खच्चीकरण करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न यासाठी निमित्त झाला आहे, असे भाजपच्या एका बड्या नेत्याने सांगितले. मागील वर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या गनिमी काव्यामुळे राज्यात सत्ताबदल होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या सत्तास्थानी आले. हे माहिती असूनही मुख्यमंत्र्यांचा एक निकटवर्तीय सातत्याने भाजपला कमी लेखण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना आता त्यांची जागा भाजप योग्यवेळी दाखवेल, असा इशारा या नेत्याने दिला.

भाजपने युतीधर्म पाळून शिवसेनेला डिवचण्याचा, विकास कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही. तरीही भाजप नेत्यांना डिवचण्याचा प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जात असल्याने आता घोडामैदान जवळ आहे, असे या नेत्याने सांगितले. कल्याण लोकसभेतील कल्याण पूर्व, डोंबिवली भाजपचे बालेकिल्ले आहेत. बदलापूर पट्ट्यात भाजपचे वर्चस्व आहे. मनसे आमदार प्रमोद पाटील, कळवा-मुंब्राचे राष्ट्रवादीचे आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर मुख्यमंत्री सुपुत्राचे सख्य सर्वश्रृत आहे. कल्याण लोकसभेची जागा शिवसेनेला देऊन पायावर धोंडा पाडून घेण्यापेक्षा भाजपचाच उमेदवार ही जागा लढवेल, असा विश्वास या नेत्याने व्यक्त केला.

हेही वाचा – जमाखर्च : राधाकृष्ण विखे-पाटील, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री; वादाची परंपरा कायम पण पक्षातील महत्त्व वाढले

कल्याण, भिवंडी लोकसभेतील भाजपचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशातील कारकिर्दीला नऊ वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधून ठाणे जिल्ह्यात भाजपच्या राष्ट्रीय, प्रदेश नेत्यांचे जाहीर सभा, नागरिकांशी संवाद कार्यक्रम आयोजित केले आहेत.

भाजप कार्यक्रम

महाजनसंपर्क अभियानांतर्गत येत्या सोमवारी कल्याणमधील फडके मैदान येथे राज्य भाजप प्रभारी सी. टी. रवी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा दुपारी चार वाजता आयोजित केली आहे. २५ जून रोजी मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांचा शहापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे सकाळी ११ वाजता जनसंवाद कार्यक्रम आयोजित केला आहे.

“राज्यातील लोकसभा मतदारसंघाची भक्कम बांधणी करण्यासाठी भाजपने महाजनसंपर्क अभियान, राष्ट्रीय, प्रदेश नेते यांच्या जिल्हा, तालुकावर सभा, बैठका आयोजित केल्या आहेत. पंतप्रधानांची कामे लोकांपर्यंत पोहोचविणे आणि भाजपचे लोकसभेसाठी संघटन हा कार्यक्रमांचा मुख्य उद्देश आहे.” – शशिकांत कांबळे, जिल्हाध्यक्ष, भाजप कल्याण जिल्हा.