रसिका मुळ्ये
गेल्या काही वर्षांपासून राजकीय वाद, विद्यार्थी संघटनांची अरेरावी आणि जोडीला उलट सुलट विधाने यांमुळे गाजत असलेल्या विद्यापीठांनी राष्ट्रीय क्रमवारीतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
राजकीय विचारधारा, विद्यार्थी संघटना यातील मतभेदांमुळे सातत्याने धगधगत असलेल्या विद्यापीठांमध्ये दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू), जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ यांची नावे प्रामुख्याने घ्यावी लागतील. ही विद्यापीठे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वादग्रस्त ठरली आहेत. यातील बहुतेक वाद हे राजकीय होते. नक्षलवादाचा अड्डा ते विद्यार्थ्यांना राष्ट्द्रोही ठरवण्यापर्यंत उलट सुलट विधाने या विद्यापीठांबाबत केली गेली.
रामनवमीच्या दिवशी मांसाहारास बंदी घातल्याप्रकरणी दोन महिन्यांपूर्वीच जेएनयूमध्ये वाद झाला होता. या मुद्द्यावरून विद्यार्थी संघटना एकमेकांना भिडल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने सुरू झालेल्या या मुद्द्याने राजकीय वादाला खतपाणी घातले होते. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या काश्मीर फाईल्स या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या जेएनयूच्या प्रतिमेबाबतही वाद निर्माण झाला होता. कन्हैया कुमार, शर्जिल इमाम हे विद्यार्थी नेते याच विद्यापीठातील. या सगळ्या वादांच्या पलीकडे जाऊन जेएनयूने विद्यापीठांच्या कर्मवारीतील आपले स्थान कायम राखले आहे. देशात सर्वसाधारण कर्मवारीत जेएनयू दहाव्या स्थानावर आहे.
जमिया मिलिया इस्लामिया हे विद्यापीठही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध केल्यामुळे वादात सापडले होते. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी या कायद्याला विरोध करून आंदोलन सुरू केले. पुढील अनेक वाद आणि राजकीय घडामोडी, विधानांचे मूळ या आंदोलनात होते. या विद्यापीठानेही पायाभूत सुविधा, गुणवत्ता यात आपला दर्जा कायम राखल्याचे दिसत आहे. हे विद्यापीठ तेराव्या स्थानावर आहे. धार्मिक वादांमुळे चर्चेत राहणारे बनारस हिंदू विद्यापीठ अकराव्या स्थानी आहे. तीन वर्षांपूर्वी संस्कृत शिकवण्यासाठी मुस्लिम शिक्षकांची नियुक्ती करण्यास विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतला होता.
नुकताच इफ्तार पार्टीवरून विद्यापीठात वाद रंगला होता. अभ्यासक्रम, प्रवेश, परीक्षा यावरील वादापासून ते विद्यार्थी संघटनांमधील हमरीतुमरी यामुळे दिल्ली विद्यापीठ चर्चेत असते. या विद्यापीठाने यंदाच्या राष्ट्रीय क्रमवारीनुसार देशातील आघाडीच्या पंचवीस विद्यापीठांमध्ये आपले स्थान राखले असून विद्यापीठाचा तेविसावा क्रमांक आहे. पायाभूत सुविधा, गुणवत्ता, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधी, शिक्षकांची गुणवत्ता, संशोधनातील सहभाग अशा मुद्द्यांवर विद्यापीठांनी क्रमवारीत स्थान टिकवले आहे.