सुहास सरदेशमुख
महसूल राज्यमंत्री म्हणून काम करताना भाजपचे नेते सुरेश धस यांनी आष्टी तालुक्यातील अनेक देवस्थानाच्या जमिनीची विक्री केली. जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात पत्नी व इतर नातेवाईकही यांनाही सहभागी करून घेतले. त्यासाठी देवस्थानांच्या विश्वस्त नोंदणी बदलासाठी त्यांनी दबाव आणले, असा व्यक्तिश: आरोप असणाऱ्या याचिकेत गुन्हा दाखल करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला. त्यामुळे धस यांचे जुने उद्योग पुन्हा राजकीय पटलावर चर्चेत आले आहेत. केवळ एका गावातील एका खरेदी-विक्री प्रकरणात त्यांच्यावर आरोप झालेले नाहीत. या आरोपाचा गुन्हा नोंदविताना पोलिस फिर्यादीत दिलेला तपशील धस यांच्या कार्यशैलीची पद्धत स्पष्ट करणारा आहे. राजकारणातील ‘डॉन’ अशी प्रतिमा असणारे धस आपल्या मतदार संघात वाळू माफिया, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य चोरी करणाऱ्यांची पाठराखण करतात. ऐन दुष्काळात टँकर, चार छावण्या या लोकोपयोगी गरजेस मंजुरी देताना त्यांचे हस्तक्षेप प्रशासकीय पातळीवरही चर्चेत होते. वादग्रस्त आणि उद्योगी धस अशी त्यांची बीड जिल्ह्यात प्रतिमा असली, तरी राजकीय पटलावर त्यांना थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य असल्याने ते निर्धास्त आहेत, अशी बीडमध्ये चर्चा आहे.
हेही वाचा >>>स्वत: भाजपाच्या उमेदवार पण सासरेबुवांकडून काँग्रेसचा प्रचार! रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा म्हणाल्या “माझे सासरे…”
सुरेश धस, प्राजक्ता धस, मनोज रत्नपारखी, बंधू देवीदास रामचंद्र धस,अस्लम नवाब खान यांच्या जमीन प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आता परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी या प्रकरणांचा तपास करतील आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणातील तपास नि:पक्ष आणि वेगाने होईल अशा सूचना देतील, अशी अपेक्षा सर्वसामांन्यांमध्ये आहे. देवस्थान घोटाळ्याची औरंगाबाद येथे पत्रकार बैठक घेणारे राम खाडे यांच्या कंबरेला बांधलेले रिव्हॉल्वर बीड जिल्ह्यातील राजकारणाचा स्तर सांगणारे आहे. सामाजिक काम करणाऱ्यांकडे रिव्हॉल्वर असणे हे बीड जिल्ह्यात आवश्यक आहे, असे ते आवर्जून म्हणाले होते. फिर्यादीवरही विविध प्रकारचे गुन्हे आहेत. त्यामुळे आरोप करणे,त्या विरोधात न्यायालयात जाणे, याचे बीड जिल्ह्यातील राजकीय संदर्भ कधी जीवावर उठतील, हे सांगता येत नाही, हे येथील प्रत्येक सूज्ञास माहीत आहे.आमदार सुरेश धस काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात आमदार होते. त्यांचा राजकीय पगडा मात्र जिल्हा परिषदेच्या राजकारणावर.२००६ मध्ये रात्रीतून ११ सदस्य बरोबर नेत त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यातील जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या झोळीत टाकली. पुढे २०१६ मध्ये अशीच प्रक्रिया घडवून आणत त्यांनी जिल्हा परिषदेच्या कारभार पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणून दिला. राजकीय पटलावर कमालीचे उपद्रवी अशी त्यांची ओळख भाजपमध्येही आणि राष्ट्रवादीमध्येही. पण ज्या पक्षात राहतील त्या पक्षातील नेतृत्वाशी सलगी करण्याचे त्यांचे कसब कमालीचे आहे. त्यामुळे मतदारसंघातील अनेक घोळ, घोटाळे प्रशासकीय अधिकारी सहज नजरेआड करतात.
हेही वाचा >>>चुनावी हिंदू: राहुल गांधींच्या महाकाल मंदिर भेटीचा भाजपानं जोडला गुजरात निवडणुकीशी संबंध
सावरगाव घाट येथील मच्छिंद्रनाथ देवस्थानावर विधानसभा सदस्य हे पदसिद्ध सदस्य असतात. या देवस्थानच्या विश्वस्त मंडळात असताना तेथील पुजाऱ्यास हटवून २०१२ मध्ये विश्वस्त संस्थेवरील बदलास आक्षेप असताना मुदत संपलेल्या विश्वस्तांकरवी जमीन विक्री करण्यास मदत केली. त्यासाठी महसूलमंत्री पदाचा गैरवापर करून दबाव निर्माण केला. २०१६ नंतर विधानसभा सदस्य असणाऱ्या भाजपच्या भीमराव धोंडे यांना त्यांनी बैठकीसही निमंत्रित केले नाही. देवस्थानाची दानपेटी तसेच मंदिराच्या कारभारातील गैरव्यवहारावर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. पिंपळेश्वर मंदिर, विठोबा देवस्थान जमिनीबाबतही याचिकेत जाब विचारण्यात आलेला आहे. तालुका दूध संघ, बाजार समित्यांमधील जमिनीचेही मोठे घोटाळे असल्याचे आरोप त्यांच्यावर आहेतच. हे सगळे घोळ सुरू असताना पंकजा मुंडे यांच्या ऐवजी सुरेश धस यांनी ऊसतोड कामगारांचे नेतृत्व करावे असा आदेशच भाजपने काढलेला होता.जिल्ह्यातील प्रस्थापित ऊसतोडणी मजुराच्या नेतृत्वाला डावलून सुरेश धस यांना राजकीय पटावर शक्ती देण्यात आली होती. आता धस यांचे जुने उद्योग नव्याने समोर आल्यानंतर भाजपकडून कोणती भूमिका घेतली जाते, याची उत्सुकता सर्वत्र आहे.