एजाज हुसेन मुजावर
सोलापूर : भाजपने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागांचे लक्ष्य गाठण्यासाठी ‘ भाजप महाविजय २०२४ ‘ कार्यक्रम निश्चित केला आहे. त्याचे प्रदेश संयोजक आमदार श्रीकांत भारतीय यांनी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सोलापुरात वादग्रस्त नेते उदय रमेश पाटील यांची भेट घेऊन गळ घातली आहे.
उदय पाटील हे एकेकाळी सोलापुरात कुविख्यात ठरलेल्या रवी पाटील टोळीचे सूत्रधार रमेश पाटील यांचे पुत्र तर कर्नाटकातील माजी आमदार रवी पाटील यांचे पुतणे आहेत. त्यांच्या विरोधात काही गंभीर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. रवी पाटील हे सोलापूरसह शेजारच्या कर्नाटकातील विजापूर भागात राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्यांनी सुरूवातीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे मांडलिकत्व पत्कतरले होते. नंतर विरोधात भूमिका घेतली होती. २००४ साली सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीत उभे राहिले असता त्यांच्या विरोधात उदय पाटील यांनी अपक्ष उमेदवारी पुढे आणली असता त्यांचे वय उमेदवारीसाठी लागणाऱ्या वयाच्या पात्रतेत ते बसत नव्हते. त्यांनी खोटा जन्मदाखला तयार करून निवडणूक लढविण्यासाठी वापरात आणला म्हणून फसवणूक केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला होता. नंतर त्यांनी परिस्थितीला सामोरे जात, सुशीलकुमार शिंदे यांचे नेतृत्व पत्करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि सोलापूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. परंतु त्याच सुमारास गौणखनिज प्रकरणाशी संबंधित गुन्ह्यात ते अडकले. नंतर काँग्रेसपासून दुरावले असता अलिकडे कर्नाटकातील दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या संपर्कात आले. त्यांच्याच पुढाकाराने बंगळुरू- सोलापूर -बंगळुरू रेल्वे रो-रो सेवा सुरू झाली होती. परंतु ती औटघटकेची ठरली. त्यानंतर राजकारणापासून राहिलेल्या उदय पाटील यांच्याशी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा संबंध आला आणि पुन्हा ते चर्चेत आले. भिडे गुरूजींनी पाटील यांच्या रेल्वे लाईन भागातील रविशंकर बंगल्यात दोनवेळा भेट दिली होती. आता भाजपने उदय पाटील यांना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साथ देण्याची गळ घातली आहे.
हेही वाचा… बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये मतभेदाची दरी
‘ भाजप महाविजय २०२४ ‘ चे प्रमुख आमदार श्रीकांत भारतीय यांनी, उदय पाटील यांची भलावण करताना त्यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य खूप चांगले आहे. ते आपले चांगले मित्र आहेत. त्यांच्यासारखे लोक भाजपला हवे आहेत. भाजपच्या पुढील कामांसाठी उदय पाटील यांना सोबत घेणार आहोत, असे आमदार भारतीय यांनी आवर्जून नमूद केले आहे.
राज्यात ३० वर्षापूर्वी राजकारणात गुन्हेगारीचा शिरकाव झाला. निवडून येण्याची पात्रता हाच राजकारणात निकष बनला गेला. तेव्हा उल्हासनगरचा पप्पू कालानी, वसईचा भाई ठाकूर हे आमदार झाले आणि राजकारणात प्रबळ होत गेले. इकडे सोलापुरातही राजकीय पाठबळामुळे ‘गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या असलेला रवी पाटील प्रथम नगरसेवक झाला. नंतर शेजारच्या कर्नाटकातील इंडी (विजापूर) येथून सलग तीनवेळा अपक्ष आमदार होण्यापर्यंत मजल गाठली. काँग्रेस, जनता दल, शिवसेना, राष्ट्रवादी असे बहुसंख्य पक्ष फिरलेले आणि राजकीयदृष्ट्या वावटळ ठरलेले रवी पाटील यांचे बंधू रतिकांत पाटील हे उध्दव ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. तर पुतणे अमर रतिकांत पाटील हे उध्दव ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख आहेत.