संकटात आम्हीच संजय राठोड यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राठोड यांना अभय दिले. तसेच बंजारा समाजाचे संजय राठोड हेच नेते आहेत हे अधोरेखित केले.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यावर सर्वात आधी भाजपने त्यांच्या विरोधात मोहिम तीव्र केली होती. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी राठोड यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. २०२१मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात राठोड प्रकरण जड जाईल याचा अंदाज आल्यानेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांना राजीनामा देण्यास सांगितले होते.
हेही वाचा… बाळासाहेब थोरात यांना पक्षाचे बळ
राज्यात सत्ताबदल होताच मुख्यमंत्री शिंदे यांनी राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान दिले. त्यावर भाजपच्या चित्रा वाघ यांनी आवाज उठविला पण भाजपच्या अन्य नेत्यांनी गप्प बसणे पसंत केले. याउलट चित्रा वाघ यांनाच गप्प करण्यात आले.
हेही वाचा… Maharashtra Live Updates: तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या ऑफरवर राजू शेट्टी आज निर्णय घेणार?
मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी बंजारा समाजाच्या कार्यक्रमात राठोड यांचे कौतुक केले. तसेच संकटाच्या काळात आपण त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिल्याचे सांगितले. उलट अन्य लोकांनी हात वर केल्याचे सांगत खापर उद्धव ठाकरे यांच्यावर फोडले. बंजारा समाजाच्या काही गुरूंनी मध्यंतरी राठोड यांच्यावर टीका करीत शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. तर महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी बंजारा समाजाचे संजय राठोड हेच खरे नेतृत्व आहे, असा संदेश समाजाला दिला. अर्थात, समाज संजय राठोड यांना कितपत स्वीकारेल यावर सारे अवलंबून असेल.