छत्रपती संभाजीनगर : परगावी असणाऱ्या मतदारांना मतदानादिवशी आपल्याकडे बोलवा. त्यांना ‘फोन पे’ करा, त्यांची सोय करा, अशा सूचना कळमनुरीचे शिवसेना (शिंदे ) आमदार संतोष बांगर यांचे जाहीर वक्तव्य समोर आल्याने ते नव्या वादामध्ये सापडले आहेत. या चित्रफितीमुळे निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. शिवसेनेतील फूट पडण्यापूर्वीपासून संतोष बांगर यांच्याभोवती वादाचे रिंगण विस्तारतेच आहे.

‘बाहेरगावी असणाऱ्या कार्यकर्त्यांची यादी दोन दिवसांत आली पाहिजे. त्यांना आणण्यासाठी गाड्या करा. त्यासाठी काय लागतं ते सांगा. तुम्ही त्यांना जे लागेल तसं ‘फोन पे’ करून द्या.’ अशा सूचना बांगर यांनी दिल्या आहेत. त्यांचे हे मत मतदारांना आमिष असल्याने त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र या अनुषंगाने हिंगोली निवडणूक आयोगाकडे अद्याप कोणतीही लेखी तक्रार दाखल झाली नव्हती. बांगर यांनी मारहाण केल्याच्या तक्रारी करण्यात आलेल्या होत्या. विविध प्रकारच्या वादात अडकलेल्या आमदार बांगर यांनी पीक विमा कंपनीतील कर्मचाऱ्यांना आणि बांधकाम कार्यकर्त्यासही मारहाण केली होती.