नाशिक: राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाषणाची शैलीच रांगडी आणि रोखठोक. पानटपरीवर जमलेल्या मित्र मंडळींमध्ये सहजतेने गप्पा माराव्यात, त्याप्रमाणे ते जाहीर सभांमध्येही उपस्थितांशी संवाद साधत असतात. आक्रमक आणि रोखठोक शैलीमुळे त्यांची विधाने कधीकधी वादग्रस्त ठरतात. परंतु, गुलाबरावांना त्याची पर्वा नसल्याचेच वारंवार दिसून येत आहे.
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून चारवेळा निवडून आलेले शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे दरवेळी नव्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत येतात. कधीकाळी पाळधी गावात पानटपरी टाकून त्यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळली होती. तेव्हाची लाकडी फळ्यांची पानटपरी आता पूर्णत: बदलली. परंतु, मंत्रिपदावर असतानाही त्यांचा या पानटपरीलगतच्या बाकड्यावर अधूनमधून ठिय्या असतोच. या ठिकाणी जुन्या मित्रांशी ते कोणताही बडेजावपणा न दाखविता गप्पा ठोकतात. लाल दिव्याची गाडी बाजूला थांबलेली असते. स्थानिकांना यात काहीही अप्रूप वाटत नाही. शुक्रवारी जळगाव येथील एका कार्यक्रमात अर्थ खात्यासारखे नालायक खाते नसल्याचे वादग्रस्त विधान करुन त्यांनी नव्या वादाला तोंड फोडले. परंतु, बिनधास्तपणे बोलणे हीच त्यांची ओळख असल्याचे स्थानिक सांगतात.
एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचारात गुलाबरावांनी आपल्या मतदारसंघातील रस्त्यांची तुलना थेट अभिनेत्री हेमामालिनीच्या गालांशी केली होती. धरणगावातील रस्ते हेमामालिनीच्या गालासारखे नसतील, तर राजीनामा देऊन टाकेल, असे आव्हान त्यांनी एकनाथ खडसेंचा नामोल्लेख न करता दिले होते. यावरून बराच गदारोळ उडाला होता. भाजपने त्यांच्यावर आगपाखड केली. राज्य महिला आयोगाने जाहीर माफी मागण्याची सूचना त्यांना केली होती. दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे धरणगाव आणि एरंडोल परिसरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. जळगाव शहरासह अनेक भागात दुषित पाणी पुरवठा सुरू होता. या संदर्भातील प्रश्नावर गुलाबरावांची जीभ पुन्हा घसरली. पुरामुळे पाणी पुरवठा करणारे पंप पाण्याखाली गेले. मग आकाशातून पाणी टाकू का, असे विधान त्यांनी केले होते. शिवसेनेतील बंडानंतर जळगाव येथील एका कार्यक्रमात त्यांनी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांवर टिपण्णी केली होती. बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाहीत. हात-पाय बघणारा कधीच स्त्रीरोगतज्ज्ञ होऊ शकत नाही, आम्ही जनरल फिजिशियन आहोत. ज्याची बायको नांदत नाही, तोही आमच्याकडे येतो. डॉक्टरांचे एकाच ‘फॅकल्टी’चे डोके असते. आमच्याकडे वेगवेगळ्या समस्या असतात, त्या समजून घेत आम्ही काम करतो, असे ते जाहीरपणे म्हणाले होते. भाषणात अनेकदा ते शेरोशायरीचा वापर करतात. असेच एकदा त्यांनी ज्याच्यावर केस (गुन्हा) नाही, तो शिवसैनिक नाही, असा दाखला दिला होता.