नीलेश पानमंद

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : राज्यात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर मतदार संघातून निवडणूक लढविणारे मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पाठिंबा देऊ केल्याने त्यांच्यातील मैत्री वाढली होती. परंतु मशिदीवरील भोंगे काढण्यावरून पुकारलेल्या आंदोलनाच्या मुद्दयावरून मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी एकमेकांवर कडाडून टीका केली होती. तेव्हापासून आव्हाड आणि जाधव यांच्यातील मैत्रीमध्ये काहिसा दुरावा निर्माण झाला असतानाच, त्यापाठोपाठ आता हर हर महादेव चित्रपटावरून हे दोन्ही नेते एकमेकांसमोर पुन्हा उभे ठाकल्याचे चित्र आहे. यामुळे ठाण्यात मनसे-राष्ट्रवादीच्या मैत्रीत तणाव निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राज्यातील सत्ता समीकरणे जशी बदलतात, तसे त्याचे पडसाद स्थानिक पातळीवरील राजकारणात दिसून येतात. नेमके हेच चित्र सध्या राज्यातील सत्ताबदलाचा केंद्रबिंदू असलेल्या ठाणे शहरात दिसून येत आहे. २०१४ मध्ये राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता होती. त्यावेळी आंबा विक्री स्टाॅल लावण्यावरून झालेल्या वादातून भाजप आणि मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. यामुळे मनसे विरुद्ध भाजप असा सामना शहरात रंगला होता. असे असतानाच, दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यात जवळीक वाढू लागल्याचे चित्र होते. रंगपंचमीच्या दिवशी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि मनसेचे जाधव यांची भेट घेऊन रंगपंचमीचा उत्सव साजरा केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर मनसे कार्यकर्त्यांमधून तीव्र प्रतिक्रीया उमटू लागल्या होत्या. त्यावेळी अविनाश जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. त्यावेळेस आव्हाड यांनी पोलिस ठाण्यात जाऊन जाधव यांची भेट घेतली होती. यामुळे या दोन्ही नेत्यांमधील मैत्री वाढल्याचे चित्र होते.

हेही वाचा : मालेगावात १०० कोटींच्या कामांवरून दादा भुसे- शेख रशीद यांच्यात श्रेयवाद

राज्यात २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा- विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांची युती होईल की नाही अशी शंका होती. परंतु शेवटच्या क्षणी दोन्ही पक्षांची युती झाली. त्यामुळे या निवडणुकीत ठाणे शहर मतदार संघातून भाजपचे आमदार संजय केळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडी असल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली होती. परंतु राष्ट्रवादीने अंतिम क्षणी माघार घेऊन मनसेला पाठिंबा दिला होता. जाधव आणि आव्हाड यांच्या मैत्रीमुळेच राष्ट्रवादीने हा निर्णय घेतल्याची चर्चा तेव्हा राजकीय वर्तुळात होती. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी या मतदारसंघाची निवडणूक ही शेवटच्या क्षणी चुरशीची झाल्याचे दिसून आले होते. मनसेला राष्ट्रवादीने दिलेली टाळी आणि त्यात काँग्रेसने अखेरच्या क्षणी दिलेला छुपा पाठिंबा यामुळे या निवडणुकीची समीकरणे काहीशी बदलतील, अशी चर्चा होती. परंतु अखेरच्या क्षणी भाजपचे आमदार संजय केळकर हे विजयी झाले. परंतु

हेही वाचा : शहाजी बापू म्हणतात, आम्ही भाजपचे मांजर मारले म्हणून गुवाहाटीला जाऊन प्रायश्चित घेतले

मशिदीवरील भोंगे काढण्यावरून पुकारलेल्या आंदोलनाच्या मुद्दयावरून मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी एकमेकांवर कडाडून टीका केली होती. तेव्हापासून आव्हाड आणि जाधव यांची मैत्री काहीशी दुरावली असतानाच, त्यापाठोपाठ आता हर हर महादेव चित्रपटावरून हे दोन्ही नेते एकमेकांसमोर पुन्हा उभे ठाकल्याचे चित्र आहे. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील विवियाना माॅलमध्ये सोमवारी रात्री सुरू असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पडला. त्यानंतर अविनाश जाधव यांनी माॅलमध्ये जाऊन हा शो पुन्हा सुरू केला. या उलट दुसऱ्या दिवशी मनसेच्या वतीने या शो चे पुन्हा आयोजन करण्यात आले. त्यामुळे हर हर महादेव चित्रपटावरून दोन्ही नेत्यांतील राजकीय मैत्रीत तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy between avinash jadhav and jitendra awad in the har har mahadev movie thane print politics news tmb 01