दिगंबर शिंदे
सांगली : शिवसेनेतील फुटीनंतर या पक्षात ठाकरे विरुद्ध शिंदे गटात सुरू असलेली लढाई गल्लीपासून दिल्लीपर्यंत रंगलेली असताना आता ही लढाई गणेशोत्सवातील स्वागत कमानीपर्यंत पोहोचली आहे.
गेली २५ वर्षे लक्षवेधी भव्य स्वागत कमानींमुळे मिरजेतील गणेशोत्सव आकर्षण ठरलेला असताना या वर्षी शिवसेनेतील फुटीमुळे दोन गटांनी पारंपरिक जागेवर हक्क सांगितल्याने तेढ निर्माण झाली आहे. मिरजेतील महाराणा प्रताप चौकामध्ये स्वागत कमान उभारण्याची शिवसेनेची परंपरा आहे. यंदा या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबरच शिवसेनेच्या ठाकरे गटानेही हक्क सांगितला असून प्रशासनाने गणेशोत्सव आठ दिवसावर येऊन ठेपलेला असतानाही अद्याप आपला निर्णय राखून ठेवला आहे.
मिरजेतील गणेशोत्सवाच्यावेळी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर स्वागत कमानी उभारण्याची गेल्या २५ वर्षाची परंपरा आहे. स्वागत कमानीवर राजकीय नेत्याबरोबरच पौराणिक, ऐतिहासिक दृश्ये नयनरम्य देखावे विद्युतझोतात प्रदर्शित करण्याची परंपरा असून या स्वागत कमानींची उंची ५० फुटापर्यंत तर लांबी ८० फुटापर्यंत असल्याने हे आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरत आले आहे. हिंदू एकता आंदोलन, शिवसेना, मराठा महासंघ, विश्वशांती, धर्मवीर संभाजी महाराज तरूण मंडळ, विश्वश्री पैलवान मंडळ, हिंदू-मुस्लिम मित्र मंडळ, एकता कला, क्रीडा मंडळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदींकडून या स्वागत कमानी उभारण्यात येतात.
मिरजेतील लक्ष्मी मार्केटमधील गर्दीचा उच्चांक होत असलेल्या महाराणा प्रताप चौकामध्ये शिवसेनेच्यावतीने स्वागत कमान उभारण्यात येते. यंदाही सर्वच ठिकाणी स्वागत कमान उभारणीचे काम गतीने सुरू असताना या जागेवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाकडून स्वागत कमान उभारणीसाठी परवानगी मागण्यात आली आहे. निष्ठावान गटाकडूनही परवानगीसाठी याच जागेची मागणी करण्यात आल्याने पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेतील फुटीचे पडसाद धार्मिक कार्यक्रमातही दिसून येत आहेत. या कमानीसाठी दोन्ही गटाकडून तयारी करण्यात येत असली तरी पोलिसांनी याबाबत अंतिम निर्णय दिलेला नाही. तरीही या जागेच्या हक्कावरून दोन्ही गटामध्ये कोणताही कलह निर्माण होऊ नये यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत. दोन्ही गटाच्या प्रमुखांना प्रतिबंधात्मक आदेशाच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
याच ठिकाणी २००९ मध्ये उभारण्यात आलेल्या शिवसेनेच्या स्वागत कमानीवरील अफझल खान वधाच्या प्रतिमेवरून दोन समाजात तेढ निर्माण होऊन होऊन दंगल उसळली होती. या दंगलीचा राजकीय लाभ भाजपला झाला होता. दंगलीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिरजेबरोबरच सांगली, इचलकरंजीत भाजपला यश मिळाले होते. यामुळे शिवसेनेची स्वागत कमान ही राजकीय यशाची पायरी म्हणून राजकीय पक्षांकडून पाहिले जाते.
दोन महिन्यापूर्वी शिवसेनेत फूट पडल्याने राज्यात सत्तांतर झाले. भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री पदाची संधी एकनाथ शिंदे यांना मिळाली असली तरी गावपातळीवरही सत्ताबदलाचे पडसाद शिवसेनेत उमटले आहेत. जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांची शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्तीही केली आहे. तर दुसरे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी ठाकरे गटाशी आपली निष्ठा कायम ठेवली आहे. दोन्ही गटाकडून बांधणी सुरू असून याला गणेशोत्सवाचे निमित्त महत्वाचे ठरले आहे. शिंदे गटाकडून शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न होत असताना ठाकरे गटाकडून निष्ठावंतांची ताकद कायम असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्नही या स्वागत कमानीच्या माध्यमातून सुरू आहे.