मुंबई : शिवसेना ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाजाचा मिळालेला लक्षणीय पाठिंबा पाहता या समाजाला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न शिवसेना शिंदे गट करू लागला आहे. भायखळा मतदारसंघाच्या शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी मुस्लीम महिलांसाठी बुरखावाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुस्लीम समाज आठवू लागला का? अशी टीका विरोधकांनी सुरू केली आहे.
हेही वाचा >>> सागरी सेतूमुळे परदेशात आल्याचा भास; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
भाजपबरोबर सरकार स्थापन केल्याने महायुतीतील घटक पक्ष शिवसेना व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटापासून राज्यातील मुस्लीम समाज दुरावला असल्याचे चित्र आहे. एकगठ्ठा मतपेटी असलेल्या या समाजाला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चुचकारण्याचा प्रयत्न शिवसेना शिंदे व अजित पवार गट करीत आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या भायखळा विधानसभा मतदारसंघातील आमदार यामिनी जाधव यांनी मंगळवारी मुस्लीम समाजातील महिलांना बुरखावाटप केले. त्यावरून विरोधकांनी शिंदे गटावर टीका सुरू केली आहे. सकाळ-संध्याकाळ हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाला आता मुस्लीम समाजाची गरज वाटू लागली का? असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. विकासाचे मुद्दे नसल्याने मतांवर डोळा ठेवून प्रत्येक योजना तसेच कार्यक्रम राबविले जात आहेत. एकीकडे पदोपदी मुस्लीमद्वेष पसरवण्याचे काम कारायचे आणि दुसरीकडे मुस्लीम महिलांना बुरखावाटप करण्याचे ढोंग करायचे अशी दुट्ट्पी भूमिका शिंदे गटाची आहे, अशी टीका अंधारे यांनी केली.