प्रदीप नणंदकर
लातूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी ७२ फुटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करावा या मागणीसाठी आंबेडकर प्रेमी जनतेतून आंदोलन सुरू झाले असून यातून पुतळ्यासंबंधी नवा वाद निर्माण झाला आहे .
लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे विलासराव देशमुख यांच्या हस्ते पूर्णाकृती आंबेडकरांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते. या पार्कवर खासदार सुधाकर शृंगारे यांच्या पुढाकाराने तात्पुरते प्लास्टर ऑफ पॅरिसचा ७२ फुटी आंबेडकरांचा पुतळा गेल्या १३ एप्रिलला उभा करण्यात आला होता. महिनाभरानंतर तो पुतळा हलवला जाईल असे म्हटले होते. मात्र गेल्या ९ महिन्यापासून तो पुतळा त्याच ठिकाणी राहिला .पावसामुळे अडचण होऊ नये त्यामुळे त्या पुतळ्यावरती प्लास्टिक झाकून ठेवण्यात आले.
हेही वाचा… राज्यासाठी धक्कादायक राजकीय घटनांचे सरते वर्ष, राजकीय लढाई न्यायालयात
आता नव्याने आंबेडकर प्रेमी जनतेने त्याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७२ फुटी पुतळा उभा करावा अशी मागणी सुरू केली आहे. ही मागणी थेट विधानसभेत पोहोचली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात माजी पालकमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी हा प्रश्न उपस्थित करून ७२ फुटी पूर्णाकृती पुतळ्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली .लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क मैदानावर पूर्णाकृती पुतळा यापूर्वीच उभा करण्यात आला आहे .मैदानाचे सुशोभीकरण करण्यासाठी अन्य बाबीची तरतूद करावी एक पुतळा असताना त्या ठिकाणी पुन्हा नव्याने पुतळा उभा करणे हे कितपत हिताचे? आहे असा विचार मांडला. गृहमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुतळ्यासंबंधी आमदार संभाजी पाटील निलंगेकर व आमदार अमित देशमुख या दोघांशी चर्चा करून सन्माननीय तोडगा काढला जाईल लोकांना आंदोलन करावे लागणार नाही अशी भूमिका घेतली .विधानसभेतील ही चर्चा लातूरमध्ये पोहोचल्यानंतर आंबेडकर प्रेमी जनतेने अमित देशमुख यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले, त्यांच्या प्रतिमेला चप्पल मारो आंदोलन केले.
हेही वाचा… नाशिक पदवीधर काँग्रेस कायम राखणार?
आंबेडकर प्रेमी जनतेचे म्हणणे आहे, आंबेडकर पार्कच्या मागील बाजूस होणाऱ्या मार्गाला विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात आले आहे ,नाना नानी पार्कला विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात आले आहे ,लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात आले आहे याबद्दल आम्ही कसलीही हरकत घेतलेली नाही .आंबेडकरांचे एका मैदानावर दोन पुतळे उभा राहिले तर तुमच्या पोटात का दुखायला लागले? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तर समाज माध्यमातून एका घरात दोन आमदार चालतात तर एका मैदानावर दोन आंबेडकरांचे पुतळे उभे केले तर बिघडले कुठे ?असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे आंबेडकरांच्या पुतळ्यावरून नव्याने लातूरात वाद निर्माण झाला आहे.