हर्षद कशाळकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलिबाग : पाच वर्षांपूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भुषण’ पुरस्कार जाहीर झाल्यावर वाद झाला होता. आताही ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्यावर विरोध सुरू झाल्याने रायगडमध्ये या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभुषण जाहीर करण्यावर संभाजी ब्रिगेड संघटनेनी आक्षेप घेतला आहे. या आक्षेपाबाबत जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सन्मान हा महाराष्ट्राचा सन्मान असल्याची प्रतिक्रीया राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा… कृषी मेळा‌वा की राजकीय आखाडा?

जेष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांची राज्यसरकारने यंदाच्या महाराष्ट्र भुषण पुरस्कारासाठी निवड केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर श्री समर्थ संप्रदायात उत्साहाचे वातावरण आहे. रायगड जिल्ह्यात गावागावात अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले आहेत. अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या लाखो अनुयायांनी या सन्मानाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा… अनिल देशमुख यांच्या तेव्हा भाजप प्रवेशाची चर्चा आणि ती घटना….

मात्र संभाजी ब्रिगेड संघटनेनी यावर आक्षेप घेतला आहे. पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर केलेला महाराष्ट्र भुषण पुरस्कार राज्य सरकारने मागे घ्यावा अशी मागणी पुरषोत्तम खेडेकर आणि मनोज आखले यांनी केली आहे. या मागणीनंतर रायगड जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रीया उमटल्या आहेत.

हेही वाचा… “पहाटेच्या शपविधीबाबत संजय राऊतांना…”, फडणवीसानंतर संजय शिरसाटांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “अजित पवार बोलले तर…”

पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी हे लाखो श्री सदस्यांचे श्रध्दास्थान आहेत. त्यामुळे संभाजी ब्रिगेडनी चुळबूळ करू नये नाही तर मनसैनिक त्यांचा बंदोबस्त करतील असा थेट इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिला आहे. आप्पासाहेबांनी नानासाहेबांच्या नंतर अध्यात्म आणि सामाजिक सेवेचा त्यांचा वारसा अत्यंत समर्थपणे चालवला आहे. आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचं मोठं कार्यही केलं आहे. अशा तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आयुष्य वेचणार्‍या आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण जाहिर झाल्याने या पुरस्काराची उंची वाढली आहे. त्यांनी समाजासाठी केलेल्या कार्यामुळे त्यांचा गौरव होत आहे. मात्र समाजासाठी तळागाळात कार्य करणार्‍या आप्पासाहेबांना विरोध करणे म्हणजे समाजातील चांगल्या कार्याला, विकासाला विरोध करण्यासारखे आहे असल्याचे शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी म्हंटले आहे.

हेही वाचा… शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य लवकरच ठरणार

तर डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी विवीध सामाजिक उपक्रमातून मानवतेचा संदेश अधोरेखित करत तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी आणि समाजाच्या सेवेसाठी आपले संपुर्ण आयुष्य समर्पित केले आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र भुषण जाहीर होणे योग्यच असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आदिती तटकरे यांनी व्यक्त केले आहे. तर गेली ३० वर्ष अप्पासाहेब धर्माधिकारी निरुपणाच्या माध्यमातून अध्यश्रध्दा निर्मुलन, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता दूत म्हणून कार्यकरत आहेत. त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यामुळे डॉ. धर्माधिकारी यांची पुरस्कारासाठी निवड होणे योग्यच असून संभाजी ब्रिगेडकडून पुरस्कार परत घ्या अशी मागणी करणे अत्यंत चुकीचे आहे असे मत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार महेंद्र दळवी यांनी केली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy over maharashtra bhushan award objection taken by sambhaji brigade print politics news asj