अंबरनाथ: मला जर मंत्रिपद दिले तर एक आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत होता. त्यावेळी आम्ही काही लोकांनी समजूतदारपणा दाखवला. त्या आमदाराला आता सिडकोचे अध्यक्षपद दिले आहे, असे वक्तव्य शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी केल्याने शिवसेना शिंदे गटातील मंत्रिपदाची रस्सीखेच चव्हाट्यावर आली आहे.
गोगावले यांनी अप्रत्यक्षपणे आमदार संजय शिरसाठ यांच्यावर टीका केली आहे. मंत्रिपद मिळाले नाही तर कुटुंब उद्ध्वस्त होईल असेही एकाने सांगितले होते. आम्ही समजून घेत मंत्रिपद सोडले, असेही गोगावले म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहता पाहता आता विधानसभेची मुदत संपण्याचा काळ जवळ आला. त्यामुळे काही इच्छुकांची नुकतीच महामंडळांवर बोळवण करण्यात आली आहे. त्यामुळे काही जणांचे असे पुनर्वसन झाले असले तरी खदखद कायम आहे. ही खदखद शिवसेनेचे आमदार आणि नुकतीच राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागलेल्या भरत गोगावलेंनी बोलून दाखवली. अंबरनाथ शहरात महाड, पोलादपूर, माणगाव येथील मूळ रहिवासी आणि अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, उल्हासनगर आणि डोंबिवली शहरात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांचा वार्षिक संवाद मेळावा पार पडला. यावेळी गोगावले उपस्थित होते.