चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठातील सभागृहाला स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्यासंदर्भातील अधिसभेतील ठराव रद्द करावा या मागणीसाठी ज्येष्ठ आदिवासी सामाजिक कार्यकर्ते वसंतराव कुलसंगे यांनी बेमुदत उपोषण आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी ठराव रद्द करण्याचे आश्वासन दिले. मात्र आता खासदार बाळू धानोरकर व माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार या काँग्रेस नेत्यांनी हा ठराव आम्ही दिलेल्या इशाऱ्यामुळेच रद्द झाला, असे सांगत श्रेय घेण्यासाठी धडपड चालवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… शरद पवार, नितीन गडकरी यांच्या कोल्हापूर दौऱ्यात राजकीय, निवडणुकीची बांधणी

हेही वाचा… भांडी, कुंडी, साडीच्या माध्यमातून महिला मतांची पेरणी

गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाला स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे नाव दिल्यानंतर आदिवासी समाजात विरोधाची तीव्र लाट उसळली. प्रत्यक्षात संघ धार्जिण्या अधिसभेच्या सदस्यांनी विद्यापीठाच्या पहिल्याच बैठकीत हा विषय आणल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले गेले. अन्य विषयांपेक्षा सभागृह नामकरणाचा विषय चर्चेत आला, त्यावर मतदान झाले. २२ विरुद्ध १२ मतांनी नामकरणाचा ठराव मंजूर देखील झाला. मात्र त्यानंतर आदिवासी समाजात या नामकरणाच्या विरोधात संतापाची लाट उसळली. त्यामुळे गडचिरोली तथा चंद्रपूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी चांगलेच हादरले. नामकरणाला सर्वत्र विरोध होत असल्याने त्याचा आगामी निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो ही बाब भाजप नेत्यांच्या निदर्शनास आली. त्याच दरम्यान ज्येष्ठ आदिवासी सामाजिक कार्यकर्ते वसंतराव कुलसंगे यांनी बेमुदत उपोषण आंदोलनाला सुरुवात केली असतानाच प्रजासत्ताक दिन आला. त्यामुळे कुलगुरू डॉ.बोकारे यांच्यावर राजकीय दबाव वाढला. त्यामुळे त्यांना नामकरणाचा ठराव रद्द करण्याचे आश्वासन द्यावे लागले. ही वस्तुस्थिती असताना खासदार बाळू धानोरकर व माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी श्रेय घेण्यासाठी धडपड चालविली आहे. धानोरकर व वडेट्टीवार यांनी केवळ नामकरणाचा ठराव मागे घ्यावा असा इशारा दिला होता. कुलसंगे प्रत्यक्षात उपोषणाला बसले हाेते, हे येथे उल्लेखनीय.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy over the naming of gondwana universitys auditorium print politics news asj