उमाकांत देशपांडे
मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप केलेले बहुसंख्य नेते एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून भाजपबरोबर आल्याने सोमय्या यांची पंचाईत झाली आहे. या नेत्यांबाबत सोमय्या कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता असेल.
सोमय्या यांनी अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ , हसन मुश्रीफ आधी नेत्यांविरोधात सिंचन गैरव्यवहार, राज्य सहकारी बँक, साखर कारखान्यातील गैरव्यवहार गेली अनेक वर्षे जोरदार आघाडी उघडली होती. अंमलबजावणी संचालनालय, प्राप्तीकर विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. सिंचन गैरव्यवहार प्रकरणी काही अधिकारी आणि अजित पवारांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ईडीने अजित पवार यांच्या नातेवाईकांकडेही छापे टाकून चौकशी केली आहे. मंत्री हसन मुश्रीफ, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांविरोधातही सोमय्या यांनी मोहीम चालविली. मुश्रीफ यांच्याबरोबर चांगलीच जुंपली होती आणि सोमय्या यांना पोलिसांनी कोल्हापूरला जाण्यापासून मुंबईतच रोखले होते.
हेही वाचा >>> अजित पवारांमुळे त्रिपक्षीय सरकारचे भाजपचे स्वप्न अखेर साकार
मुश्रीफांची ईडी कारवाईतून सुटका ?
ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाकडून त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांची सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना आणि अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्जपुरवठा प्रकरणात चौकशी सुरु आहे. ईडीकडून मुश्रीफांविरोधात ३५ कोटी रुपयांचा आर्थिक अफरातफरीचा (मनी लाँड्रिंग) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर ईडीकडून तीन वेळा छापे टाकण्यात आले आहेत. मुश्रीफ यांच्या त्यांच्या तिन्ही मुलांमागेही ईडीचा ससेमिरा सुरु आहे. मुश्रीफांविरोधात कोल्हापूर आणि मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या कोल्हापूरमध्ये त्यांच्या विरोधात १०८ तक्रारी दाखल झाल्या असून या प्रकरणांचा तपास कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेकडून करण्यात येत आहे.
सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे हे नेते आता भाजपबरोबर सरकारमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधातील कायदेशीर कारवाई आता थंडावण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> जितेंद्र आव्हाडांच्या निष्ठा थोरल्या पवारांपाशी
शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक, यामिनी व यशवंत जाधव आदींविरोधातही सोमय्या यांनी आघाडी उघडली होती. सरनाईक यांची अनधिकृत बांधकामे तर जाधव यांचे स्थायी समितीतील गैरव्यवहार यावर सोमय्या यांनी टीकेची झोड उठविली होती. शिंदे गटातील हे नेते भाजपबरोबर आल्यावर सोमय्यांची तोफ थंडावली, तेच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबाबतही होणार आहे.
भाजपबरोबर आल्यावर सरनाईक, जाधव व अन्य नेत्यांच्या विरोधातल सोमय्या यांची आरोपबाजी बंद झाली होती. आता अजित पवार, तटकरे, भुजबळ, मुश्रीफ यांच्याबाबत सोमय्या आवाज उठविणार का, असा प्रश्न केला जात आहे.