जालना, नांदेड : मराठा आरक्षण मागणीसाठी सहाव्यांदा उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनास विरोध करत ओबीसी नेत्यांनी प्रतिआंदोलन सुरू केल्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने शुक्रवारी मध्यरात्री घोषणाबाजी झाली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र जरांगे यांच्या समर्थनार्थ बंद पाळण्यात आला. नांदेड जिल्ह्यातही सोमवारी बंदची हाक देण्यात आली आहे.

प्रा. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळाजवळून आंतरवली सराटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी अडथळे उभे केले असून त्यासाठी पर्यायी रस्त्यांवरून जाण्याची विनंती वाहनधारकांना केली जात आहे. परंतु शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी जरांगे समर्थक आणि प्रा. हाके यांना पाठिंबा देण्यासाठी येणारे कार्यकर्ते समोरासमोर आले. दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे परिसरात पुन्हा मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, धाराशिव, तुळजापूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. दुकाने बंद होतीच शिवाय शाळा महाविद्यालयाचे कामकाजही सुरळीत होऊ शकले नाही.

हेही वाचा >>>आंतरवलीजवळ आंदोलकांच्या घोषणाबाजीमुळे तणाव; आंदोलनप्रतिआंदोलनाने वाद

जरांगे यांच्या आंतरवली सराटी येथे आंदोलनाचा शनिवारी पाचवा दिवस होता. तर ओबीसीच्या मागण्यांसाठी याच गावात अॅड. मंगेश ससाणे यांच्या उपोषणाचा शनिवारी चौथा दिवस होता. आंतरवाली सराटी गावाकडे जाणाऱ्या वडीगोद्री फाट्यावर ओबीसी आंदोलनकर्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा शनिवारी तिसरा दिवस होता.

आंतरवली सराटीकडे जाणाऱ्या जरांगे समर्थकांनी आमच्या उपोषण स्थळाजवळ घोषणाबाजी केली त्यामुळे ओबीसी समर्थकांनी प्रतिघोषणा दिल्या. दरम्यान या वेळी हाके यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, की बोलताना ताळतंत्र बाळगावे हा सल्ला देसाई यांनी जरांगे यांना द्यावयास पाहिजे.

हेही वाचा >>>विधानसभेचे पूर्वरंग: शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी

मराठा आणि कुणबी एकच आहेत. आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत. आपण राजकारणाची भाषा करत नसून मागणी मान्य करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही संधी आहे. नाहीतर सर्व मराठा समाज फडणवीस दोषी आहेत, असे म्हणतील. हा संदेश गेल्यामुळे २०२४ मधील निवडणुकीमध्ये त्यांचे सर्व गणित बिघडेल. – मनोज जरांगेमराठा आरक्षण आंदोलन नेते

जरांगे यांचा ओबीसी आरक्षणाबाबत अभ्यास नाही. ओबीसी आरक्षणातच पंचायत राज्य व्यवस्थेत धनगरांचेही आरक्षण आहे. मराठा समाज ओबीसीमध्ये आला तर त्याचा परिणाम धनगरांच्या आरक्षणावर होणार नाही का? धनगर जर ओबीसी प्रवर्गात नाहीत तर महादेव जानकर आणि पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी जरांगे यांनी बैठका कशासाठी घेतल्या?प्रा. लक्ष्मण हाकेओबीसी आरक्षण बचाव समितीचे नेते