कर्नाटकमध्ये गो-तस्करीचा विरोध करणाऱ्या पुनिथ केरेहळ्ळीवर इद्रिस पाशा या व्यक्तीचे लिंचिंग करून हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुनिथ सध्या फरार असून त्याचे अनेक भाजपा नेत्यांसोबतच फोटो व्हायरल झाल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजपाच्या प्रवक्त्याने यावर लगेच प्रतिक्रिया देऊन पुनिथ केरेहळ्ळीसोबत पक्षाचे कोणतेही संबंध नसल्याचे सांगून हात झटकले. बंगळुरू जिल्ह्यात गाईंची वाहतूक करणाऱ्या इद्रिस पाशाचा शुक्रवारी (दि. ३१ मार्च) मृतदेह आढळून आला होता. इद्रिसचा भाऊ युनूस पाशाने इद्रिसचे लिंचिंग करून त्याची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. संघ परिवाराशी संबंधित असलेल्या पुनिथने मागच्या काही वर्षांपासून धार्मिक मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतलेली असून त्याच्यावर अनेक खटले दाखल आहेत.
‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलत असताना युनूस पाशाने सांगितले की, इद्रिसच्या छाती आणि पाठीवर चटके दिल्याचे निशाण दिसून आले. त्याला जबर मारहाण झाल्याच्या जखमाही शरीरावर आम्हाला दिसल्या. केरेहळ्ळी आणि त्याच्या साथीदारांनी इद्रिसचे वाहन सोडण्यासाठी दोन लाखांची खंडणी मागितली होती. इद्रिसने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली, असा दावा युनूसने एफआयआरमध्ये केला आहे.
युनूसच्या दाव्यावर रामानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कार्थिक रेड्डी म्हणाले, “आम्ही शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहोत. आरोपी केरेहळ्ळी आणि त्याचे साथीदार फरार असून त्यांना पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आलेली आहेत. आरोपींवर भादंवि कलम ३०२ (खून), ३४१ (चुकीच्या उद्देशाने थांबविणे), ५०४ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमानित करणे) आणि ३२४ (शस्त्रांच्या साहाय्याने गंभीर जखमी करणे) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.” इद्रिसचे वाहन रोखल्यानंतर त्याच्यासोबत गाडीत असलेले दोघे जण पळून गेले. इद्रिस पळून जाऊ नये म्हणून त्याला रोखण्यासाठी आरोपींनी स्टन गन (विजेचा धक्का देण्यासाठी) वापरली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याआधी केरेहळ्ळीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्याच्या हातात स्टन गन दिसत होती. ज्याच्या धाकावर तो गाईंची वाहतूक करणाऱ्या गाड्या थांबवत होता.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका केली. त्यांनी ट्विट करत म्हटले की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांप्रदायिक दंगली भडकवून मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी जाणूनबुजून इद्रिसचे प्रकरण घडवले गेले आहे. या घटनेसाठी राज्याचे गृहमंत्री थेट जबाबदार आहेत.
कोणकोणत्या नेत्यांसोबत केरेहळ्ळीचे फोटो?
भाजपाचे प्रवक्ते एम. जी. महेश यांनी हे आरोप फेटाळून लावत पोलिसांना तपास करू दिला पाहिजे, असे सांगितले. केरेहळ्ळीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेक भाजपा नेत्यांसोबतचे फोटो पोस्ट केलेले आहेत. यापैकी भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दक्षिण बंगळुरूचे खासदार तेजस्वी सूर्या, भाजपा खासदार प्रताप सिम्हा, तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई, श्री राम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुथालिक, कर्नाटक भाजपाचे मंत्री सी. एन. अश्वथ नारायण आणि बी. सी. नागेश यांच्यासोबतचे फोटो केरेहळ्ळीने पोस्ट केलेले आहेत. भाजपाच्या नेत्यांसोबत व्हायरल झालेल्या फोटोंबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, मी मागच्या ४० वर्षांपासून भाजपात आहे. भाजपासाठी अनेक लोक काम करत आहेत. पुनिथ केरेहळ्ळीचा पक्षाशी संबंध आहे का, याबाबत मी ठामपणे सांगू शकत नाही.
कोण आहे पुनिथ केरेहळ्ळी?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय केरेहळ्ळी बंगळुरूमध्ये टॅक्सीचालकाचे काम करत होता. या वेळी चालकांच्या संघटनेचे प्रतिनिधित्वही त्याने केले. राजकीय पक्षांनी टॅक्सीचालकांची संघटना तयार करण्याची सुरुवात केल्यानंतर केरेहळ्ळी भाजपाच्या संपर्कात आला. केरेहळ्ळीसोबत टॅक्सी चालविण्याचे काम करणाऱ्या एका चालकाने सांगितले की, स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी केरेहळ्ळी सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना लक्ष्य करत असे. जात आणि धर्माच्या अनुषंगाने त्यांच्यावर आरोप करून त्याचे व्हिडीओ बनवून प्रसारित केल्यामुळे अनेकांनी त्याला सोशल मीडियावर फॉलो करण्यास सुरुवात केली. पुढे जाऊन तो संघाच्या अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावू लागला.
जुलै २०२१ मध्ये केरेहळ्ळीवर पहिला गुन्हा दाखल झाला. बंगळुरूमधील बेगूर तलावाजवळ असलेली भगवान शिवाची मूर्ती हटविण्याच्या विरोधात केरेहळ्ळीने आंदोलन सुरू केले. ही जागा ख्रिश्चन मिशनऱ्यांना मिळणार असल्याचा आरोप त्याने केला होता. सप्टेंबर २०२१ रोजी ख्रिश्चन समाजाच्या सार्वजनिक प्रार्थनेवर केरेहळ्ळी आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला करून प्रार्थना थांबविली. त्या ठिकाणी धर्मपरिवर्तन होत असल्याचा आरोप त्याने केला होता.