सध्या देशात राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. छत्तीसगड वगळता उर्वरित चार राज्यांत एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर या सर्व पाच राज्यांचा निकाल एकाच दिवशी ३ डिसेंबर रोजी जाहीर केला जाईल. दरम्यान, ही निवडणूक जिंकण्यासाठी या राज्यांतील प्रादेशिक तसेच भाजपा आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांत स्पर्धा लागली आहे. असे असतानाच आता या निवडणुकीत कम्युनिष्ट पार्टी ऑफि इंडिया (मार्क्सवादी) म्हणजेच सीपीआय (एम) या पक्षाने उडी घेतली आहे. हा पक्ष राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड या चार राज्यांत उमेदवार उभे करणार आहे.
छत्तीसगडमध्ये तीन, मध्य प्रदेशमध्ये चार जागांवर निवडणूक लढवणार
सीपीआय (एम) या पक्षाने वेगवेगळ्या राज्यांची विधानसभा निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. हा पक्ष मिझोरम वगळता मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा तसेच राजस्थान या एकूण चार राज्यांमध्ये आपले उमेदवार उभे करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा पक्ष छत्तीसगडमध्ये तीन, मध्य प्रदेशमध्ये चार जागांवर आपले उमेदवार उभा करणार आहे. तेलंगणातील किती जागा लढाव्या हे अद्याप या पक्षाने ठरवलेले नाही. हा पक्ष राजस्थानमध्ये एकूण १७ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. या सर्व जागांसाठीच्या उमेदवारांची यादी प्रदेश सीपीआय (एम) पक्षाने तयार केली आहे. सीपीआय (एम) च्या विद्यमान दोन आमदारांच्या नावांचाही यात समावेश आहे.
हमास-इस्रायल युद्धावर चर्चा
सीपीआय (एम) पक्षाच्या केंद्रीय समितीची दिल्लीमध्ये दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. या बैठकीत इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धावरही चर्चा करण्यात आली. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत युद्धविराम, स्थानिकांचे संरक्षण तसेच मदतकार्य याबाबत ठराव मांडण्यात आला होता. मात्र मोदी सरकारने या ठरावावर मतदान केले नाही. यावरही सीपीआय (एम) पक्षाने मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला.
काँग्रेस, भाजपाला इतर पक्षांचे आव्हान
दरम्यान, छत्तीसगड, मध्य प्रदेश तसेच राजस्थान या राज्यांत काँग्रेस आणि भाजपा अशी थेट लढत होणार आहे. असे असले तरी राजस्थानसारख्या राज्यात या दोन्ही पक्षांना काही स्थानिक पक्षांचे आव्हान आहे. आम आदमी पार्टीसारख्या पक्षाने येथे आपले उमेदवार उभे केले आहेत. मध्य प्रदेशमध्ये जागावाटपावरून समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात वाद झाले आहेत. येथे समाजवादी पार्टी, संयुक्त जनता दल, आम आदमी पार्टी या तिन्ही पक्षांनी ९२ पेक्षा अधिक जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. याचा फटका काँग्रेसला बसू शकतो.
तेलंगणा राज्यात तिहेरी लढत
तर तेलंगणा राज्यात काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांना भारत राष्ट्र समिती या पक्षाचे आव्हान असणार आहे. सध्या येथे भारत राष्ट्र समितीची सत्ता आहे. या पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केला जात आहे. असे असतानाच सीपीआय (एम) या पक्षानेही निवडणुकीत उडी घेतल्यामुळे राजकीय समीकरणात काय बदल होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.