छत्रपती संभाजीनगर : हिंगोली जिल्ह्यातील राजकारणाच्या गुन्हेगारीचा प्रकार थेट गोळीबारापर्यंत गेला आहे. बळसोड ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळविल्यानंतर विरोधक राम कदम, श्याम कदम आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष यांच्यावर गोळीबार घडवून आणला, असा जबाब जखमी पप्पू चव्हाण यांनी पोलिसांकडे दिला आहे. हल्ला करणारा अक्षय इंदुरिया यास सांभाळून घेऊ असे त्यास आमदार बांगर यांनी सांगितले होते, अशी माहिती सुमित शिके नाव्याच्या व्यक्तीने त्यांना दिली होती, असे चव्हाण यांनी जबाबात म्हटले असल्याचे पोलिसांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान ‘भाजयुमो’चे अध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावरही आतापर्यंत १९ गुन्हे दाखल आहेत. एका गोळीबारानंतर हिंगोलीच्या राजकारणाचे गुन्हेगारी रुप समोर येऊ लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंगोली पोलिसांनी मात्र गोळीबाराचे हे प्रकरण व्यक्तिगत मारहाणाच्या रागातून घडल्याची माहिती दिली आहे. अक्षय इंदुरिया याचे एका मुलीवर प्रेम होते. ते त्या मुलीच्या घरात कळाल्यानंतर अक्षय इंदुरिया यास समजावून सांगावे अशी विनंती मुलीच्या वडिलांनी पप्पू चव्हाण यांच्याकडे केली होती. प्रियकर इंदुरिया यास समजावून सांगताना चव्हाण यांनी त्यास मारहाणही केली होती. यात इंदुरिया याचे हाड मोडले होते. तो बरे झाल्यानंतर इंदुरिया याने मित्राच्या सहाय्याने हा गोळीबार केला. मात्र, पोलिसांच्या या तपासात आता पप्पू चव्हाण् यांच्या जबाबाने नवी भर टाकली आहे. दुखावलेल्या अक्षय इंदुरियाचा वापर करून आपल्याला संपविण्याचे काम ग्रामपंचयातीमधील राजकीय विरोधक राम व श्याम कदम यांनी आमदार संतोष बांगर यांना एका मंदिरात सांगितले. तेव्हा पुढे इंदुरियास लागणारी मदत करू, असे त्यांना आश्वासन दिल्याचे सुमित शिके यांनी आपल्याला सांगितल्याचा दावा फिर्यादी चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणाचे पडसाद आता विधिमंडळात उमटले असून भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी या प्रकरणात आता राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडून या गोळीबाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा – सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे राहुल गांधींच्या लोकप्रियतेत भर? राष्ट्रीय राजकारणात काय बदल होणार?

हेही वाचा – अकोल्यात जुळवाजुळवीवर सर्वच राजकीय पक्षांचा भर

नांदेड व हिंगोली जिल्ह्यात गावठी कट्टे सहज विकत मिळत आहेत. त्यामुळे नांदेड व हिंगोली जिल्ह्यात खुनांच्या घटनांची वारंवारिता वाढू लागली आहे. आता गोळीबाराच्या घटनांना राजकीय किनार असल्याचाही आरोप होऊ लागला आहे. दरम्यान गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. या प्रकरणात प्रत्येक बाजूने तपास केला जाईल, असे जल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime in politics in hingoli exposed after shooting incident print politics news ssb