ठाणे : मुंबईच्या सीमेवरील पाचही टोल नाक्यांवरून हलक्या वाहनांचा प्रवेश टोलमुक्त करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानंतर भाजप, शिंदे गट आणि मनसेमध्ये श्रेय मिळविण्यासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंदनगर आणि एलबीएस टोलनाक्यावर ढोल, ताशाच्या गजरात जल्लोष साजरा केला. तर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आनंदनगर टोलनाक्यावर मोटार चालकांना लाडू वाटप केले. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही जल्लोष साजरा केला.

मुंबईच्या वेशीवर आनंदनगर, वाशी, ऐरोली, मुलुंड एलबीएस रोड टोलनाका आणि दहिसर असे पाच टोलनाके आहेत. ठाणे जिल्ह्यातील नोकरदार या टोलनाक्यांवरून वाहतूक करत असतात. या टोलनाक्यांवर हलक्या आणि अवजड वाहनांना टोल भरावा लागतो. तसेच टोल भरतानाच्या प्रक्रियेमुळे टोलनाक्यांवर रांगा लागत असतात. त्यामुळे कोंडीची समस्या देखील सहन करावी लागते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या पाचही टोल नाक्यांवरील हलक्या वाहनांना टोल मुक्त करण्याच निर्णय सरकारने घेतला. निवडणुकीच्या तोंडावर आता या निर्णयानंतर आता ठाण्यात भाजप, शिंदे गट आणि मनसेमध्ये श्रेय मिळविण्यासाठी चढाओढ रंगल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>>Sangamner Vidhan Sabha Constituency 2024 : सुजय विखे संगमनेरमधून निवडणूक लढण्याचे आव्हान स्वीकारणार?

मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आनंदनगर टोलनाक्यावर वाहन चालकांना, टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना लाडूचे वाटप केले. तर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही जल्लोष साजरा केला. त्यानंतर आनंद नगर टोलनाका येथे भाजपचे नेते मिहीर कोटेचा यांनी जल्लोष साजरा केला. तर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मुलुंड येथील एलबीएस रोड टोलनाक्यावर वाहन चालकांना पेढे वाटप करून जल्लोष केला.

टोल मुक्तीबाबत आम्ही गेल्या नऊ वर्षांत वारंवार आंदोलने केली आहेत. अधिवेशनात आवाज उठविला आहे. मात्र आता हलक्या वाहनांना टोल मुक्ती देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे वाहतूक कोंडी दूर होईल. शिवाय वाहनाच्या इंधनाची बचत होऊन ठाणेकरांची आर्थिक बचत होणार आहे. – संजय केळकर, आमदार, ठाणे.

मागील २० वर्षांपासून आम्ही टोल भरत होतो. टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागत होत्या. आता टोल आणि वाहतूक कोंडीतून ठाणेकरांची मुक्ती झाली आहे. हा दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे पाहायला मिळाला. मनसे कार्यकर्त्यांनी टोलमुक्तीसाठी अनेक आंदोलने केली. पोलिसांचा लाठीमार सहन करावा लागला. टोल मुक्ती फक्त मनसे मुळेच झाली आहे.- अविनाश जाधव, मनसे नेते.