मुंबई : जोगेश्वरीत पंचतारांकित हॉटेल उभारण्यात झालेल्या आर्थिक घोटाळ्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने तपास बंद करण्याचा अर्ज न्यायालयात सादर करून शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना अभय दिल्याबद्दल काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर टीका केली आहे. वायकर यांच्यावर आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या आता कुठे गेले, असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना मुंबई पोलिसांनी त्यांना अभय देणे म्हणजे भाजपच्या धुलाई यंत्रामधून वायकरांना स्वच्छ केल्याचे आणखी एक प्रकरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार आहेत, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीआधी पक्ष बदलून वायकर हे सत्ताधारी पक्षाबरोबर गेले तेव्हाच त्यांनी कारण सांगितले होते, अशी टीका पटोले यांनी केली.

हेही वाचा >>>आम्ही संसदेत ‘पार्ट टाइमर’ आहोत काय? चिदम्बरम यांच्या टीकेवर उपराष्ट्रपतींचा सवाल

जनतेला सांगा -वडेट्टीवार

गैरसमजातून गुन्हा दाखल झाल्याचा हवाला पोलिसांनी दिला आहे. यावरून गैरसमजातून गुन्हे दाखल होतात ही बाब पहिल्यांदाच महाराष्ट्राला कळली आहे. गैरसमजातून असे अजून कोणते गुन्हे दाखल झाले आहेत हेसुद्धा लोकांसमोर यावे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

तर, भाजप किंवा मित्र पक्षात प्रवेश केल्यावर यंत्रणांकडून अभय हा घटनाक्रमच तयार झाला आहे. असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला आहे.

●ठाकरे गटात असताना वायकर यांच्या विरोधात जोगेश्वरीत मुंबई महानगरपालिकेच्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेल उभारण्यात ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

●ईडी, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या घोटळ्याचा तपास केला होता. ईडीने वायकर यांची चौकशी केली होती. वायकर व त्यांच्या पत्नीला अटक होणार हे निश्चित झाले असताना वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश करून स्वत:ची सुटका करून घेतली होती.

शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानेच वायकर यांना अभय मिळाले आहे. त्यांच्या विरोधातील चौकशी वा तपास बंद करण्यात आला आहे. उद्या हे सरकार कुख्यात दाऊदलाही अभय देईल. – संजय राऊत , खासदार, ठाकरे गट