पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील निवडणुकीला रंगत येऊ लागताच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आजवरचा अनुभव पणाला लावत राजकीय फासे टाकण्यास सुरूवात केल्याने दररोज एक-एक मोठा मासा गळाला लागू लागला आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यायाने भाजपसमोर आव्हाने उभी राहू लागली आहेत. भोरचे माजी आमदार आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे, पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे, मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्यानंतर आता इंदापूर आणि दौंड या विधानसभा मतदार संघातील कोणता मोठा मासा गळाला लागणार, याबाबत आगामी काळात उत्सुकता असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारामती लोकसभा मतदार संघ हा शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी अस्तित्त्वाची लढाई झाली असताना, शरद पवार यांनी राजकीय डावपेच खेळण्यास सुरुवात केली आहे. माजी मंत्री अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांच्यातील वैर हे तब्बल २५ वर्षांचे हाेते. एकेकाळी थोपटे हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. मात्र, १९९९ च्या निवडणुकीत पवार यांच्यामुळे थोपटे यांचा पराभव झाला. त्यामुळे थोपटे यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न कायमचे भंग पावले. थोपटे यांच्या मनाला ही सल कायम बोचत असल्याने बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांनी थोपटे यांची पहिल्यांदा भेट घेतली. त्यातून मतदारांमध्ये वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून करण्यात आला. मात्र, शरद पवार यांनी त्यांचा हा डाव मोडून काढला. शरद पवार यांनी थोपटे यांची भेट घेऊन २५ वर्षांचे वैर कायमचे मिटवले. त्यानंतर भोरमध्येच शेतकऱ्यांच्या मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीची घोषणा केली.

हेही वाचा : शरद पवारांचे बेरजेचे राजकारण बारामतीत अजितदादांसाठी अडचणीचे

पवार यांच्या या पहिल्या खेळीनंतर अजित पवार यांचे विरोधक माजी आमदार विजय शिवतारे हेदेखील अचानक उघडपणे बोलू लागले आणि त्यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. त्यामागचा ‘बोलविता धनी’ कोण, असा प्रश्न अजित पवार आणि भाजपला पडला आहे. या दोन मोठ्या नेत्यांनंतर आता मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी शरद पवार यांची दोन आठवड्यांपूर्वी भेट घेतल्यानंतर त्यांनी मनसेचा जय महाराष्ट्र केले. मोरे यांचा प्रभाव असलेला परिसर हा बारामती लोकसभा मतदार संघात येतो. मोरे यांनी कोणत्या पक्षात जायचे, हे अद्याप जाहीर केले नसले, तरी त्यांची ओढ ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे असल्याची राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा : मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा, तर नायब सिंह सैनी नवे मुख्यमंत्री; हरियाणात नक्की काय घडतंय?

या तीन नेत्यांमुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी भोर, पुरंदर आणि खडकवासला या मतदार संघांमध्ये तोडफोडीचे आणि जोडाजोडीचे राजकारण सुरू झाले असताना आता दौंड आणि इंदापूर या दोन विधानसभा मतदार संघातील कोणते मोठे मासे गळाला लागणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सध्या इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांच्याबरोबर आहेत. दौंड विधानसभा मतदार संघात माजी आमदार रमेश थोरात हेदेखील अजित पवारांच्या पाठिशी आहेत. त्यामुळे आता शरद पवार कोणती चाल खेळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : ममता बॅनर्जी विश्वासघातकी; काँग्रेसची टीका

बारामतीतील व्यापाऱ्यांचे एका दिवसात मतपरिवर्तन

बारामतीमध्ये शरद पवार यांनी व्यापाऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यासाठी सोमवारी व्यापाऱ्यांनी उपस्थित राहणे शक्य नसल्यााचे कळविले. मात्र, एका दिवसात त्यांचे मतपरिवर्तन झाले. व्यापायांनी निर्णय बदलून मेळावा घेण्याची तयारी दर्शविली. एका दिवसात निर्णय कोणामुळे बदलला गेला, याची ही आता चर्चा सुरू झाली आहे

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity about the sharad pawar s political strategies in pune and baramati for lok sabha election 2024 print politics news css