प्रल्हाद बोरसे
मालेगाव : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी मालेगावात सभा होत आहे. या बहुचर्चित सभेच्या तोंडावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर भाग भांडवल घोटाळा केल्याचा आरोप करताना शिंदे गटालाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. या आरोपानंतर उभय गट परस्परांविरुध्द आक्रमक झाल्यामुळे ठाकरे हे सभेत या प्रकरणाविषयी काही बोलतात काय, याविषयी उत्सुकता आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील मालेगावचे दादा भुसे आणि नांदगावचे सुहास कांदे हे दोन्ही आमदार तसेच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे एकनाथ शिंदेंच्या गटात दाखल झाले. भुसे यांचे जाणे ठाकरे गटाला अधिक जिव्हारी लागल्याने त्यांनी भाजपला धक्का देत मालेगावात भुसे यांना पर्याय म्हणून भाजपच्या अद्वय हिरे यांना गळाला लावले. जानेवारी महिन्यात मुंबई येथे हिरे यांना ठाकरे गटात प्रवेश देतेवेळी मालेगावात उद्धव ठाकरे यांची सभा घेण्याचेही नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार रविवारी होत असलेल्या या सभेत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे.
हेही वाचा… रायगडमध्ये रस्त्यावरून भाजप आणि शिंदे गटात श्रेयवादाची लढाई
संजय राऊत यांनी साधलेली वेळ
शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण गेल्यानंतर राज्यात विभागवार जाहीर सभा घेण्यासाठी निघालेले उद्धव ठाकरे यांची पहिली सभा कोकणात खेड येथे झाली. दुसरी सभा मालेगावात होत आहे. ठाकरेंच्या सभेस किती गर्दी जमते, सभेत ठाकरे काय बोलतात ,याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या सभेच्या नियोजनासाठी खासदार संजय राऊत हे मालेगावात येऊन गेले. मालेगावातून परतल्यावर राऊत यांनी एक ट्विट करत पालक मंत्री दादा भुसे यांच्यावर भाग घोटाळ्याचे गंभीर आरोप केले. “गिरणा मोसम शुगर ॲग्रो ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज या कंपनीच्या माध्यमातून भुसे यांनी शेतकऱ्यांकडून शेअर्सच्या नावाने १७८ कोटी २५ लाख रुपये गोळा केले. परंतु, संबधित कंपनीच्या वेबसाईटवरील माहितीवरुन प्रत्यक्षात ४७ लोकांच्या नावावर केवळ १ कोटी ६७ लाखाचे शेअर्स दाखविण्यात आले असून ही लूट आहे.” असे राऊत यांनी या आरोपात नमूद केले होते. भुसेंच्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या ठाकरेंच्या सभेपूर्वीची वेळ ‘ साधत करण्यात आलेल्या या आरोपामुळे मोठा धुरळा उडाला आहे.
हेही वाचा… फाडलेला वटहुकुम आता राहुल गांधी यांच्या मुळावर
प्रकरण नेमके काय ?
अनेक वर्षे बंद आणि सततच्या तोट्यामुळे तालुक्यातील दाभाडी येथील गिरणा सहकारी साखर कारखाना अवसायनात निघाला होता. वित्तीय संस्थांची कर्जे फेडण्यासाठी १० वर्षांपूर्वी डीआरटी न्यायालयाने हा कारखाना लिलावात काढला होता. तेव्हा आमदार असलेल्या दादा भुसे यांच्या पुढाकाराने गिरणा बचाव समितीच्या माध्यमातून लोकांकडून भाग गोळा करण्यात आले होते. विक्रीस काढलेला हा कारखाना अन्य कुणी बाहेरच्या व्यक्तीने घेण्यापेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून उभ्या राहिलेल्या भाग भांडवलातून तो खरेदी केला गेला तर तालुक्यातील शेतकऱ्यांकडे या कारखान्याची मालकी येईल,असा त्यामागे हेतू होता. त्यानुसार ११०० रुपये प्रती भाग याप्रमाणे साधारत: १० हजार शेतकऱ्यांकडून एक कोटी ६७ लाखाचे भाग भांडवल जमा झाले. दरम्यानच्या काळात नाशिकचे तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने २७ कोटी १५ लाखाला हा कारखाना लिलावात खरेदी केला. त्यावेळी गिरणा बचाव समितीने स्थापन केलेल्या गिरणा मोसम शुगर ॲग्रो ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज कंपनीने आपल्याकडे गोळा झालेले भाग भांडवल ‘आर्मस्ट्राँग’कडे सुपूर्द करत या कंपनीशी व्यावसायिक भागीदारी केली. तेव्हा आर्मस्ट्राँगकडे कारखाना हस्तांतरणाचा जो कार्यक्रम पार पडला होता,त्याचवेळी भाग भांडवलाच्या रकमेच्या धनादेशाचेही जाहीररित्या हस्तांतरण झाले होते. आर्मस्ट्राँग’कडे व्यवस्थापन आल्यावर हा कारखाना पुन्हा सुरु झाला. दोनेक वर्षांनी बंद पडला. पुढच्या काळात भुजबळ यांच्यावर सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईत त्यांच्या काही मालमत्ता गोठविल्या गेल्या.
भाग भांडवलच्या माध्यमातून पुरेशी रक्कम जमा होऊ न शकल्याने कारखाना घेणे शक्य होऊ शकले नाही, तरी जमा झालेली संपूर्ण रक्कम देऊन स्थानिक गिरणा कंपनीच्या माध्यमातून ‘आर्मस्ट्राँग’मध्ये हिस्सेदारी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची वस्तुस्थिती असताना राऊत हे अत्यंत बिनबुडाचे आरोप करीत असल्याची टीका भुसे समर्थकांनी केली आहे. राऊत म्हणतात त्याप्रमाणे भाग भांडवलच्या माध्यमातून आम्ही गोळा केलेली रक्कम कारखान्याच्या किंमतीपेक्षा सहा पट अधिक आहे. जर एवढी रक्कम गोळा झाली असती तर कारखाना आम्हीच खरेदी केला नसता का, असा प्रश्न भुसे यांनी उपस्थित केला आहे. या आरोपावरून भुसे हे विधीमंडळात अत्यंत आक्रमक झाले होते. दुसरीकडे आपल्याकडे यासंबंधी सर्व पुरावे असल्याचा दावा राऊत हे करीत आहेत. उभय गटातील या दावा-प्रतिदाव्यांमुळे घोटाळ्याच्या आरोपात खरेच तथ्य आहे का, याविषयी तालुक्यात चर्चा रंगली आहे. या आरोपावरुन भुसे समर्थकांनी राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत निषेध नोंदवला आहे. इतकेच नव्हेतर याबद्दल माफी न मागितल्यास त्यांना धडा शिकविण्याचा इशारा दिला आहे. त्यास प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटानेही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत भाग गोळा करण्याच्या प्रकरणात भुसे यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला.
या पार्श्वभूमीवर ठाकरे यांची सभा होत असल्याने हा विषय गाजण्याची चिन्हे आहेत.