कोल्हापूर : अध्यक्षपदाचा वाद मिटल्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सोमवारी निपाणीत येत आहेत. स्थानिक काँग्रेसने राष्ट्रवादीच्या या उमेदवारीबद्दल आधीच आक्षेप घेतला आहे. यामुळेच पवार हे निपाणीत कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने कर्नाटकची निवडणूक विशेष महत्त्वाची ठरली आहे. एकीकडे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला. तो टिकवण्यासाठी पक्षात रणनीती आखली जात आहे. त्यासाठी कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे हुकमी पान म्हणून पाहिले जात आहे. यामुळेच कर्नाटकात ४० जागांवर उमेदवार उभे करण्याची जोरदार घोषणा करण्यात आली. प्रत्यक्षात ९ ठिकाणी उमेदवार उभे करण्यात आले. यापैकी काही ठिकाणी राष्ट्रवादीला यश मिळण्याचे संकेत असल्याने उमेदवारांनी प्रचाराला गती दिली आहे. कर्नाटक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख हरी आर यांनी भाजपचे चार ते पाच विद्यमान आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला होता. मात्र याबाबत गाडे पुढे सरकले नाही.

हेही वाचा – वर्धा: अवैध व्यावसायिकांशी संबंध तीन पोलीस शिपायांना भोवले

निपाणी मतदारसंघात प्रचाराचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. फौजीया खान, अमोल मिटकरी, हसन मुश्रीफ, आमदार रोहित पवार, रोहित पाटील आदींच्या सभा पार पडल्या आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने प्रचाराची सुरुवात दमदार झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्येही हुरूप आला होता. पण पवारांच्या राजीनामा नाट्याने व्यत्यय आला होता. यामुळे कर्नाटकातील उमेदवारांच्या प्रचारामध्ये शिथिलता आली. प्रचाराची गती काहीशी कमी झाली. स्टार प्रचारकांचा अभाव जाणवत राहिला.

हेही वाचा – ‘एनजीटी’कडून ‘एसीसी सिमेंट’ कारखान्याच्या चौकशीचे आदेश; अदानी समूहाचा कारखाना

शरद पवार यांची पहिली जाहीर सभा सोमवारी निपाणी येथे होणार आहे. शरद पवार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे काही बडे नेते कर्नाटकात दाखल होणार आहेत. त्यांनी प्रचाराला गती देण्याची भूमिका घेतली असल्याने उमेदवारांच्याही जिवात जीव आला आहे. अखेरच्या टप्प्यातील वातावरण निर्मितीचा फायदा होऊन उमेदवारांना बळ मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.