काँग्रेसने भाजपाला धूळ चारत कर्नाटकमध्ये एकहाती सत्ता मिळवली. काँग्रेसने या राज्याचे मुख्यमंत्रीपद सिद्धरामय्या तर उपमुख्यमंत्रीपद डी. के. शिवकुमार यांच्याकडे सोपवले आहे. दरम्यान, सध्याचे काँग्रेस सरकार पूर्ण बहुमतात आहे. असे असले तरी हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही. अंतर्विरोधामुळेच हे सरकार कोसळेल, असा दावा भाजपाकडून केला जातो. असे असतानाच डी. के शिवकुमार यांनी सिद्धरामय्या आपल्या आधीच्या कार्यकाळात घाबरले होते, असे विधान केले आहे. घाबरल्यामुळेच त्यांनी प्रकल्प पुढे राबवला नाही, असेही शिवकुमार म्हणाले आहेत.
…तेव्हा सिद्धरामय्या घाबरले होते
“या आधी मुख्यमंत्री असताना सिद्धरामय्या यांना एक स्टीलचा पूल बांधायचा होता. मात्र या प्रकल्पामुळे मोठा गदारोळ झाला होता. तेव्हा सिद्धरामय्या घाबरले होते. परिणामी त्यांनी हा प्रकल्प बंद केला. त्यांनी तो प्रकल्प पूर्ण करायला हवा होता,” असे शिवकुमार म्हणाले आहेत. बसवेश्वर नगर ते हेब्बल या उड्डाणपुलाचा संदर्भ देत शिवकुमार बोलत होते. २०१७ साली या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. पुढे विरोध झाल्यानंतर हा प्रकल्प बंद करण्यात आला होता.
शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले
काँग्रेसने कर्नाटकमध्ये निवडणूक जिंकली असली तरी सत्तास्थापनेदरम्यान येथे बराच गोंधळ उडाला होता. मुख्यमंत्रिपदासाठी शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोन्ही नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यानंतर बऱ्याच चर्चांनंतर सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले, तर शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले.
शिवकुमार यांच्या या विधानावर काँग्रेसेचे नेते तथा मंत्री प्रियांक खरगे यांनी प्रतिक्रिया दिली. “सिद्धरामय्या तेव्हा घाबरलेले नव्हते. सिद्धरामय्या हे जनमताप्रती संवेदनशील आहेत. कधीकधी खोट्या गोष्टी मोठ्या प्रमाणात पसरवल्या जातात आणि चांगले निर्णय मागेच राहतात, असे शिकुमार यांना म्हणायचे असावे,” असे खरगे म्हणाले आहेत.
दरम्यान, काँग्रेसने कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन केली असली तरी, हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा भाजपाकडून केला जातो. त्यामुळे शिवकुमार यांनी केलेल्या विधानाला फार महत्त्व आले आहे. या निमित्ताने काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि खदखद बाहेर येणार का? असे विचारले जात आहे.